‘बळीराजा आधार, एक हात मदतीचा’ उपक्रम सुरू; दानशूर व्यक्तींनी मदतनिधीत योगदान द्यावे – विजय आमले यांचे आवाहन
श्रीक्षेत्र माहूर | प्रतिनिधी
श्री रेणुका माता शारदीय नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पंचायत समिती माहूरच्या शिक्षण विभागाने दुष्काळी परिस्थितीमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकरी कुटुंबांना मदतीचा हात देण्यासाठी ‘बळीराजा आधार, एक हात मदतीचा’ हा सामाजिक उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून गरजू शेतकऱ्यांना आर्थिक मदत करून त्यांच्या कुटुंबीयांची दिवाळी आनंदात साजरी व्हावी, हा उद्देश आहे. या संवेदनशील उपक्रमात दानशूर व्यक्ती आणि सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या नागरिकांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन व्हॉइस ऑफ मीडियाचे जिल्हा उपाध्यक्ष विजय आमले यांनी केले आहे.
मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील आणि माहूर तालुका शिक्षण विभागाचे गटशिक्षणाधिकारी संतोष शेटकार यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात येत आहे. शेतकरी हा देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा आणि संपूर्ण समाजाचा पोशिंदा आहे. मात्र, पावसाची अनिश्चितता, पावसाची कमतरता आणि वाढत्या आर्थिक अडचणींमुळे अनेक शेतकरी कुटुंबांना संकटांचा सामना करावा लागत आहे.
या परिस्थितीत शेतकरी कुटुंबांच्या चेहऱ्यावर आनंद फुलावा आणि त्यांनाही सन्मानाने दिवाळी साजरी करता यावी, या उदात्त हेतूने मदतनिधी उभारण्याचा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या निधीतून गरजू शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यात येणार आहे. समाजातील प्रत्येकाने आपल्या क्षमतेनुसार मदतीचा खारीचा वाटा उचलल्यास संकटग्रस्त कुटुंबांना मोठा आधार मिळू शकतो, असा संदेश या अभियानातून देण्यात येत आहे.
श्री रेणुका माता नवरात्रोत्सवाच्या पवित्र पर्वात धार्मिक उत्सवाला सामाजिक सेवेची जोड देत शिक्षण विभागाने सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न केला आहे. शेतकऱ्यांच्या कष्टांचा सन्मान करून त्यांच्या कुटुंबांत दिवाळीचा आनंद निर्माण करण्याच्या उद्देशाने राबविण्यात येणारा हा उपक्रम समाजातील दातृत्व आणि सहकार्याची भावना वृद्धिंगत करणारा ठरत आहे.
या उपक्रमासाठी गटशिक्षणाधिकारी संतोष शेटकार, एस. एस. पाटील, काशीनाथ थोटे, संतोष मोहन चव्हाण, बालाजी येरमे, विनोद सुरोशे, आशिष माहुरे, एम. आर. जाधव, सुधीर जाधव, दिगंबर जगताप, संजय मगरे, शैलेश पाटील, यशवंत वाघमारे, अरुण धकाते, गोरख जगताप, भाग्यवान भवरे, कोंडेवाड बुच्चलवार, व्हॉइस ऑफ मीडियाचे तालुकाध्यक्ष इलियास बावाणी, संजय बनसोडे, सय्यद किरमाणी आणि राम दातीर आदी उपस्थित होते.
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी माहूर पंचायत समितीच्या शिक्षण विभागाने सुरू केलेल्या या उपक्रमात दानशूर व्यक्ती, संस्था आणि नागरिकांनी आपल्या परीने योगदान द्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.








