गावातील मान्यवर, ग्रामसभा पदाधिकारी, शिक्षक, विद्यार्थी, महिला व युवक-युवतींची उपस्थिती; शहीद वीराच्या स्मृतींना अभिवादन
एटापल्ली, सेवारी | प्रतिनिधी :
स्वातंत्र्यलढ्यात शौर्य, त्याग आणि बलिदानाचा ठसा उमटविणारे आदिवासी समाजाचे महान क्रांतिकारक वीर बाबुराव पुलेश्वर शेडमाके यांच्या १६८ व्या शहीद दिनानिमित्त ग्रामसभा सेवारीच्या वतीने अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमातून त्यांच्या ऐतिहासिक योगदानाचे स्मरण करून त्यांच्या स्मृतींना आदरांजली वाहण्यात आली.
वीर बाबुराव शेडमाके यांनी अन्यायाविरुद्ध लढा देत स्वातंत्र्य आणि स्वाभिमानासाठी केलेला संघर्ष आजही समाजासाठी प्रेरणादायी आहे. त्यांच्या बलिदानाची आठवण नव्या पिढीपर्यंत पोहोचविणे, त्यांच्या संघर्षाचा इतिहास जतन करणे आणि समाजात ऐतिहासिक वारशाविषयी जागरूकता निर्माण करणे, हा या कार्यक्रमामागील प्रमुख उद्देश होता. त्यांच्या विचारांतून प्रेरणा घेऊन समाजाने एकजूट, स्वाभिमान आणि आपल्या हक्कांविषयी जागरूक राहावे, असा संदेश यावेळी अधोरेखित करण्यात आला.
या कार्यक्रमाला गाव भूमिया मोहन गोमाडी, गाव पुजारी नेंडा पुंगाटी, गाव पाटील सोमजी गोमाडी, दसरू गोटा, पुसू गावडे, चैतू गोमाडी आणि कानू गावडे यांच्यासह गावातील मान्यवर उपस्थित होते. तसेच सुलभा गोमाडी, लिमी गोमाडी, मंगला गावडे, सुशीला गोटा आणि कमला गावडे यांच्यासह अनेक महिलांनी सहभाग नोंदविला.
ग्रामसभा अध्यक्ष राजू गोमाडी, सचिन नांगसाय गावडे आणि सल्लागार प्रकाश पुंगाटी यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला. यावेळी वट्टी सर, शिक्षकवृंद, विद्यार्थी आणि विद्यार्थिनीही उपस्थित होते. गावातील विविध घटकांनी एकत्र येऊन शहीद दिन साजरा केल्याने सामाजिक एकजूट आणि ऐतिहासिक स्मृती जपण्याची भावना दिसून आली.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अशोक गोमाडी, अमित गोमाडी, रुपेश गोमाडी, रमेश पुंगाटी, सावजी पुंगाटी, रुपेश गोटा, निलेश हलामी, आशिष हलामी, दिलीप वड्डे, दीपक वड्डे, शुभम पुंगाटी आणि जाकेश गावडे यांच्यासह इतर युवक-युवतींनी परिश्रम घेतले.
वीर बाबुराव पुलेश्वर शेडमाके यांचा शहीद दिन साजरा करणे म्हणजे केवळ एका ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वाचे स्मरण नव्हे, तर त्यांच्या त्यागातून प्रेरणा घेऊन पुढील पिढीमध्ये इतिहासाची जाणीव निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. अशा उपक्रमांमुळे ऐतिहासिक वारसा जतन होण्यासोबतच सामाजिक एकोपा, जागरूकता आणि सांस्कृतिक अस्मिता बळकट होण्यास मदत होते.
क्रांतिकारक वीर बाबुराव शेडमाके यांच्या शौर्य, त्याग आणि बलिदानाच्या स्मृतींना विनम्र अभिवादन!










