अमृत २.० अभियानांतर्गत १६० कोटी २५ लाखांची योजना; २०५६ पर्यंतची लोकसंख्या विचारात घेऊन नियोजन, येसगाव येथे साठवण तलाव उभारणार
येवला : प्रतिनिधी
येवला शहराची वाढती लोकसंख्या आणि भविष्यातील पाण्याची गरज लक्षात घेऊन अमृत २.० अभियानांतर्गत १६० कोटी २५ लाख रुपयांची पाणीपुरवठा योजना राबविण्यात येणार आहे. सन २०५६ पर्यंतच्या संभाव्य लोकसंख्येचा विचार करून या योजनेचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे शहराच्या पाणीपुरवठा व्यवस्थेला बळकटी मिळेल, असा विश्वास राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केला.
येवला शहर पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते महात्मा फुले नाट्यगृह येथे करण्यात आले. तसेच येसगाव येथील साठवण तलावाचे भूमिपूजन आमदार पंकज भुजबळ आणि माजी खासदार समीर भुजबळ यांच्या हस्ते झाले. यावेळी आयोजित कार्यक्रमात मंत्री भुजबळ बोलत होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
या योजनेअंतर्गत जुन्या आणि अपुऱ्या क्षमतेच्या जलवाहिन्या बदलण्यात येणार असून, विद्यमान पाणी वितरण व्यवस्थेत सुधारणा केली जाणार आहे. घरगुती नळजोडण्यांशी संबंधित कामेही करण्यात येतील. जलवाहिन्या टाकण्यासाठी खोदलेले रस्ते पुन्हा पूर्ववत करण्यात येणार आहेत. तसेच ऊर्जा बचतीसाठी सौरऊर्जा प्रकल्प उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
पाणीपुरवठा योजनेची कामे निर्धारित वेळेत पूर्ण करण्यासाठी संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, असे आवाहन मंत्री भुजबळ यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक नगरपालिकेचे मुख्याधिकारी तुषार आहेर यांनी केले.
यावेळी माजी आमदार मारोतराव पवार, ज्येष्ठ नेते अंबादास बनकर, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राधाकिसन सोनवणे, जिल्हाध्यक्ष दिलीप खैरे, अरुण थोरात, संभाजी पवार, डॉ. शेफाली भुजबळ, नगराध्यक्ष राजेंद्र लोणारी, उपनगराध्यक्ष पुष्पा गायकवाड, माजी नगराध्यक्ष हुसेन शेख, बंडू क्षिरसागर, भोलाशेठ लोणारी यांच्यासह महसूल विभागाचे अधिकारी, नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
असे आहे योजनेचे नियोजन
अमृत २.० अभियानांतर्गत येसगाव (ता. कोपरगाव) येथे ३०० दशलक्ष लिटर क्षमतेचा आरसीसी साठवण तलाव उभारण्यात येणार आहे. गोदावरी डाव्या कालव्यातून या तलावात पाणी आणण्याचे नियोजन आहे. येसगाव ते येवला दरम्यान १२.८२ किलोमीटर लांबीची पाणी दाबनलिका टाकण्यात येणार आहे.
शहरासाठी दररोज ७० लाख लिटर पाण्यावर प्रक्रिया करण्याची क्षमता असलेला आधुनिक जलशुद्धीकरण प्रकल्प उभारण्यात येईल. शहरातील विविध भागांना शुद्ध पाणीपुरवठा करण्यासाठी ९७.१६ किलोमीटर लांबीचे नवीन वितरण जाळे विकसित केले जाणार आहे. तसेच तहसील रोड, विचूर रोड आणि बदापूर रोड येथे नवीन उंच जलकुंभ उभारण्यात येणार आहेत.
या योजनेमुळे येवला शहरातील पाणीपुरवठा व्यवस्थेत सुधारणा होऊन भविष्यातील पाण्याची गरज पूर्ण करण्यास मदत होण्याची अपेक्षा आहे.









