संगमेश्वर विद्यालयाच्या वतीने गुणवंत विद्यार्थिनीचा सत्कार; यशामुळे विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांसाठी प्रेरणा
लोणी, ता. आंबेगाव | प्रतिनिधी –
लोकसेवा परीक्षेच्या माध्यमातून मुंबई महानगरपालिकेत सबलिपिकपदी निवड झाल्याबद्दल संगमेश्वर विद्यालय व कै. बाबुराव गेनुजी ढोबळे उच्च माध्यमिक विद्यालयाची माजी विद्यार्थिनी कु. वैष्णवी किसन टाव्हरे हिचा विद्यालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला. तिच्या या यशामुळे विद्यालयाच्या नावलौकिकात भर पडली असून, परिसरातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
वैष्णवी हिने लोकसेवा परीक्षेत यश संपादन करून प्रशासकीय सेवेत प्रवेश करण्याची संधी मिळवली आहे. मेहनत, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर ध्येय साध्य करता येते, हे तिच्या यशातून अधोरेखित झाले आहे. तिच्या या कामगिरीमुळे विद्यालयातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी प्रेरणा मिळणार असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
या सत्कार समारंभाला विद्यालयाचे प्राचार्य सुनील जावळे, साळवे सर, घाडीगांवकर सर, किरण ढोबळे सर, ग्रामपंचायत सदस्य किरण ढोबळे, सामाजिक कार्यकर्ते तथा माजी विद्यार्थी बजरंग देवडे आणि वैष्णवीचे वडील किसन टाव्हरे उपस्थित होते. तसेच विद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उपस्थित मान्यवरांनी वैष्णवीचे अभिनंदन करून तिच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. वैष्णवीच्या यशामुळे विद्यालयातील विद्यार्थ्यांसमोर प्रेरणादायी आदर्श निर्माण झाला असून, तिच्या कामगिरीचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.










