वडिलांच्या प्रोत्साहनातून कुस्तीच्या मैदानात यशाची भरारी; सिसारखेडा गावासह नेव्हारे परिवाराचा नावलौकिक वाढवला
सिल्लोड | प्रतिनिधी :
सिल्लोड तालुक्यातील सिसारखेडा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, पिराचीवाडी या शाळेची माजी विद्यार्थिनी आणि कुस्तीपटू कु. शितल संतोष पाटील नेव्हारे हिची राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड झाली आहे. तिच्या या यशामुळे सिसारखेडा गावासह परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, ग्रामस्थ, क्रीडाप्रेमी आणि नागरिकांकडून तिचे अभिनंदन केले जात आहे.
शितलचे वडील संतोष पाटील नेव्हारे यांनी मुलीला शिक्षणासोबतच खेळाची आवड जोपासण्यासाठी प्रोत्साहन दिले. कुस्तीच्या क्षेत्रात तिने प्रगती करावी आणि आपल्या कौशल्याच्या जोरावर मोठे यश संपादन करावे, यासाठी त्यांनी सातत्याने पाठबळ दिले. वडिलांच्या मार्गदर्शनातून आणि प्रोत्साहनातून शितलने कुस्तीच्या मैदानात आपली गुणवत्ता सिद्ध करत राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेपर्यंत मजल मारली आहे.
शितल ही सिसारखेडा येथील माजी उपसरपंच सौ. निर्मलाबाई संतोष नेव्हारे यांच्या कुटुंबाशी संबंधित असल्याने तिच्या यशाचे गावात विशेष कौतुक होत आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्येही क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करण्याची क्षमता असते, हे शितलने आपल्या यशातून दाखवून दिले आहे.
तिच्या या यशाबद्दल सरपंच तुळसाबाई रामदास राऊत, उपसरपंच लक्ष्मण सांडू सुरे, सौ. निर्मलाबाई संतोष नेव्हारे यांच्यासह सिसारखेडा येथील ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला आहे.
राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल कु. शितल संतोष पाटील नेव्हारे हिचे समस्त सिसारखेडा ग्रामस्थांच्या वतीने मनःपूर्वक अभिनंदन करण्यात येत आहे. आगामी स्पर्धांमध्येही तिने उत्कृष्ट कामगिरी करून आपल्या गावाचा आणि परिसराचा नावलौकिक वाढवावा, अशा शुभेच्छा व्यक्त करण्यात येत आहेत.










