‘ई-कचरा मुक्त शाळा – माझा गाव स्वच्छ गाव’ अभियानांतर्गत विद्यार्थ्यांना पर्यावरण संरक्षणाचा संदेश
तेल्हारा प्रतिनिधी : तेजराव राऊत
तेल्हारा : तेल्हारा तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, पिंवदळ बु. येथे ‘ई-कचरा मुक्त शाळा – माझा गाव स्वच्छ गाव’ या अभियानांतर्गत ई-कचरा जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना ई-कचऱ्याचे दुष्परिणाम समजावून सांगत पर्यावरण संरक्षणाचे महत्त्व पटवून देण्यात आले.
यावेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री. श्यामकुमार अंकुरकर यांनी विद्यार्थ्यांना ई-कचऱ्यामुळे पर्यावरणावर होणाऱ्या दुष्परिणामांची माहिती दिली. घरात वापरात नसलेले खराब मोबाईल, चार्जर, वायर, रिमोट आणि जुन्या बॅटऱ्या उघड्यावर फेकल्यास माती व पाण्याचे प्रदूषण होऊ शकते. या प्रदूषणाचा परिणाम पिकांवर आणि पिण्याच्या पाण्यावरही होण्याची शक्यता असते, असे त्यांनी विद्यार्थ्यांना समजावून सांगितले.
खराब इलेक्ट्रॉनिक वस्तू शक्य असल्यास दुरुस्त करून त्यांचा पुनर्वापर करावा, तसेच वापरण्यायोग्य नसलेल्या वस्तूंची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावावी, असे आवाहनही करण्यात आले.
या उपक्रमात विद्यार्थ्यांनी आपल्या घरातील खराब इलेक्ट्रॉनिक वस्तू शाळेतील ई-कचरा संकलन पेटीत जमा केल्या. विद्यार्थ्यांच्या या पर्यावरणपूरक उपक्रमाचे गावातील नागरिकांनी कौतुक केले.
दोन शिक्षकांच्या सहभागातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश
शाळेतील मुख्याध्यापक श्री. श्यामकुमार अंकुरकर, श्री. डाबेराव सर आणि श्री. पांडुरंग डाबेराव सर यांच्या सहभागातून विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाविषयी जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
या जनजागृती मोहिमेमुळे विद्यार्थ्यांना ई-कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन, पुनर्वापर आणि स्वच्छतेचे महत्त्व समजण्यास मदत झाली. शाळेच्या या उपक्रमातून ‘स्वच्छ गाव, सुरक्षित पर्यावरण’ हा संदेश देण्यात आला.










