न्यायाधीश पी. एम. माने यांचे प्रतिपादन; गोकुंदा येथे ‘सुरक्षित बचपन अभियान’ आणि पोक्सो कायद्याबाबत जनजागृती
ता. प्रतिनिधी : शेख मोईन
किनवट : बालकांचे संरक्षण ही केवळ पालकांची किंवा शिक्षकांची जबाबदारी नसून ती संपूर्ण समाजाची सामूहिक जबाबदारी आहे. बालकांना लैंगिक अपराधांपासून संरक्षण देणाऱ्या पोक्सो कायद्याबाबत जनजागृती करणे, मुलांना स्वतःच्या सुरक्षिततेची जाणीव करून देणे आणि अडचणीच्या प्रसंगी विश्वासू व्यक्तीकडून मदत घेण्याचे धैर्य त्यांच्यात निर्माण करणे, हा ‘सुरक्षित बचपन अभियानाचा’ प्रमुख उद्देश आहे. जागरूकता, सुरक्षितता आणि संरक्षण हा प्रत्येक बालकाचा अधिकार आहे, असे प्रतिपादन तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष तथा दिवाणी न्यायाधीश पी. एम. माने यांनी केले.
महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, गोकुंदा येथे ‘सुरक्षित बचपन अभियान’ आणि लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण अधिनियम, २०१२ अर्थात पोक्सो कायद्याविषयी आयोजित शालेय जनजागृती कार्यक्रमाच्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते.

राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली, महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, नांदेड यांच्या निर्देशानुसार तालुका विधी सेवा समितीच्या वतीने अखिल भारतीय शालेय जनजागृती कार्यक्रमांतर्गत या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी मिलिंद शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव अभियंता प्रशांत ठमके यांची प्रमुख उपस्थिती होती. गटशिक्षणाधिकारी निळकंठ चेटले, बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. किशोर मुनेश्वर आणि ॲड. दिलीप काळे यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. बालकांचे हक्क, त्यांची सुरक्षितता, लैंगिक अत्याचारापासून संरक्षण आणि अडचणीच्या प्रसंगी मदत मागण्याचे महत्त्व याबाबत विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण करण्यात आली.
‘माझं बालपण, माझा अधिकार’ पथनाट्यातून प्रभावी संदेश
कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेले ‘माझं बालपण, माझा अधिकार… सुरक्षितता हीच खरी ढाल!’ हे जनजागृतीपर पथनाट्य ठरले. अधिकार मित्र (पी.एल.व्ही.) उत्तम कानिंदे यांनी लिहिलेल्या या पथनाट्याचे दिग्दर्शन शिक्षक विशाल शेरे, माणिक भवरे, प्रवीण वाठोरे आणि सीमा साळवे यांनी केले.
विद्यार्थ्यांनी प्रभावी अभिनयातून बालकांचे अधिकार, सुरक्षिततेचे महत्त्व आणि अन्यायाविरुद्ध आवाज उठविण्याचा संदेश दिला. या सादरीकरणातून बालकांना स्वतःच्या हक्कांची जाणीव करून देतानाच त्यांच्या संरक्षणासाठी समाजातील प्रत्येक घटकाने सजग राहण्याचे आवाहन करण्यात आले.
मान्यवरांची उपस्थिती; शिक्षकांचे सहकार्य
या कार्यक्रमाला ॲड. व्ही. एस. सूर्यवंशी, ॲड. आर. डी. सोनकांबळे, ॲड. पी. पी. गावडे, ॲड. टी. आर. चव्हाण, अधिकार मित्र (पी.एल.व्ही.) दत्ता भालेराव आणि प्रवीण पाटील उपस्थित होते.
महाविद्यालयाच्या प्राचार्या शुभांगीताई ठमके यांच्या मार्गदर्शनाखाली उपप्राचार्य राधेश्याम जाधव, उपमुख्याध्यापक किशोर डांगे, पर्यवेक्षक रघुनाथ इंगळे, मनोज भोयर, मुकुंद मुनेश्वर, भाग्यवान खोब्रागडे, मुख्याध्यापक रवि भालेराव यांच्यासह सर्व शिक्षक-शिक्षिका आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी परिश्रम घेतले.
बालकांना सुरक्षित वातावरण उपलब्ध करून देणे, त्यांच्या हक्कांचे संरक्षण करणे आणि त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाविरोधात तत्परतेने मदत करणे, यासाठी समाजातील प्रत्येकाने जबाबदारीने पुढाकार घ्यावा, हा संदेश या अभियानातून देण्यात आला.










