५० ते ५५ वयोगटातील व्यक्तीची ओळख पटविण्यासाठी युसूफ वडगाव पोलिसांचे आवाहन; माहिती असल्यास संपर्क साधण्याचे आवाहन
केज | प्रतिनिधी :
केज-अंबाजोगाई परिसरात खळबळ उडवणारी घटना समोर आली आहे. युसूफ वडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मौजे डिगोळआंबा शिवारात कळंब-अंबाजोगाई राज्य महामार्गालगत असलेल्या कोरड्या तलावात एका अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळून आला आहे. अंदाजे ५० ते ५५ वर्षे वयोगटातील या व्यक्तीची अद्याप ओळख पटलेली नाही. मृत व्यक्तीच्या नातेवाईकांचा शोध घेण्यासाठी युसूफ वडगाव पोलिसांनी नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत व्यक्तीच्या अंगात पांढऱ्या रंगाचा फाटलेला व अर्धवट जळालेला सदरा होता. तसेच ग्रे रंगाची चड्डी असून, त्यावर काळ्या व पिवळ्या रंगाचे पट्टे आहेत. चड्डीला लाल रंगाच्या कापडाचे ठिगळ लावलेले आहे. व्यक्तीच्या कमरेला लाल रंगाचा करदोडा असून, त्याला काळ्या, पांढऱ्या आणि पोपटी रंगाच्या तीन चाव्या असलेला दोर बांधलेला आढळला आहे.

मृतदेहाच्या बाजूला काळ्या रंगाच्या चामड्याच्या शूजची जोडी आढळली. तसेच लाल चौकडीचा रुमाल असून, त्यामध्ये डेटॉल आणि मेडिमिक्स साबण आढळून आले आहेत. या वर्णनाच्या आधारे संबंधित व्यक्तीची ओळख पटविण्याचा प्रयत्न पोलीस करीत आहेत.
ओळख पटविण्यासाठी पोलिसांचे आवाहन
या वर्णनाशी मिळतीजुळती व्यक्ती आपल्या गावातून, परिसरातून किंवा कुटुंबातून बेपत्ता झाली असल्यास नागरिकांनी तातडीने युसूफ वडगाव पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप मांजरमे यांनी केले आहे.
संबंधित व्यक्तीबाबत कोणाकडेही माहिती असल्यास ती पोलिसांना कळवावी. नागरिकांकडून मिळणारी माहिती मृत व्यक्तीची ओळख पटविण्यासाठी महत्त्वाची ठरू शकते.
संपर्क क्रमांक :
- ९७३०९३४४१४
- ९२२५०९२८३७
संपर्क : संदीप मांजरमे, सहाय्यक पोलीस निरीक्षक, पोलीस स्टेशन युसूफ वडगाव.
अनोळखी मृत व्यक्तीची ओळख पटविण्यासाठी नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन युसूफ वडगाव पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे.









