आमदार रोहित पवार आणि संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी यांच्या हस्ते उद्घाटन; विविध क्षेत्रांतील मान्यवरांची उपस्थिती
श्रीगोंदा | प्रतिनिधी :
श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी बुद्रुक येथील रयत शिक्षण संस्थेच्या श्री छत्रपती शिवाजी विद्यालय व कला, विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाच्या नूतन इमारतीचा उद्घाटन समारंभ मंगळवार, १ डिसेंबर २०२६ रोजी सकाळी १० वाजता आयोजित करण्यात आला आहे. ही माहिती विद्यालयाचे प्राचार्य राजेंद्र खेडकर यांनी दिली.
नूतन इमारतीचे उद्घाटन आमदार रोहित पवार आणि रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे जनरल बॉडी सदस्य आण्णासाहेब शेलार राहणार आहेत.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून रयत शिक्षण संस्थेचे व्हाईस चेअरमन भगीरथ शिंदे, संघटक डॉ. अनिल पाटील, सचिव किशोर राजे निंबाळकर, कुलगुरू ज्ञानदेव म्हस्के, माजी मंत्री बबनराव पाचपुते, आमदार विक्रमसिंह पाचपुते, मॅनेजिंग कौन्सिल सदस्य आमदार आशुतोष काळे, मीनाताई जगधने, संदीप वर्पे, बाबासाहेब भोस, माजी आमदार राहुल जगताप, शिवाजीराव पाचपुते, सुभाषशेठ गांधी, कुंडलीकराव दरेकर, नवनाथ बोडखे आणि गणेश भोस उपस्थित राहणार आहेत.
विद्यार्थ्यांना आधुनिक आणि दर्जेदार शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने या नूतन इमारतीची उभारणी करण्यात आली आहे. उद्घाटन समारंभास रयत संकुलातील सर्व शाखाप्रमुख, विद्यार्थी, पालक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि परिसरातील नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन प्राचार्य राजेंद्र खेडकर आणि संयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.










