विद्यापीठाच्या मराठी विभागामध्ये शिक्षक दिन उत्साहात संपन्न_(अमरावती प्रतिनिधी)” शिक्षण ही निरंतर चालणारी प्रक्रिया असून नवीन गोष्टी शिकण्यासाठी आपण नेहमीच तयार राहिले पाहिजे. या ज्ञानप्रक्रियेत शिक्षकांचे स्थान खूप मोठे असते.
शिक्षक हे आपल्याला जसे विषयाचे ज्ञान देतात तसे जीवनाचे भानही देत असतात. विद्यार्थ्यांनी मिळेल तिथे आणि मिळेल त्यांच्याकडून ज्ञानाचे कण गोळा करून स्वतःला समृद्ध व ज्ञानसंपन्न केले पाहिजे”,असे प्रतिपादन मानव विज्ञान विद्याशाखेच्या अधिष्ठाता व मराठी विभागप्रमुख प्रा. डॉ. मोना चिमोटे यांनी केले.
संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या पदव्युत्तर मराठी विभागाच्या वतीने शिक्षक दिनाच्या निमित्ताने विभागात नव्याने प्रवेशित विद्यार्थी व ज्येष्ठ विद्यार्थी यांनी मिळून आपल्या शिक्षकांच्या सन्मानार्थ शिक्षक दिनाच्या कार्यक्रम आयोजित केला होता.
या कार्यक्रमाच्या अध्यक्ष म्हणून त्या बोलत होत्या. पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, “आजच्या विद्यार्थ्यांनी आपल्या विषयापुरते मर्यादित राहून चालण्यासारखे नाही. तर त्याने निरंतर ज्ञान घेत राहिले पाहिजे कारण शिक्षण ही अखंड चालणारी प्रक्रिया आहे”.
यावेळी ज्येष्ठ प्राध्यापक डॉ. माधव पुटवाड, डॉ. प्रणव कोलते हे विभागातील प्राध्यापक व्यासपीठावर उपस्थित होते. प्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना डॉ. प्रणव कोलते म्हणाले की, “साहित्य, कला, सामाजिक उपक्रम अशा सगळ्या गोष्टींशी विद्यार्थ्यांनी स्वतःला जोडून घेऊन आपले जीवन संपन्न केले पाहिजे”. या कार्यक्रमात विभागातील विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या विषयी आपल्या मनोगतातून कृतज्ञता व्यक्त केली.
प्रांकुल चिखलकर, पूजा अडोळे, राज चांदेकर या विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून शिक्षकांबद्दलचा आदर, प्रेमभाव व्यक्त केला. सारिका वनवे, वैष्णवी मुळे, मनीष तायडे, अभिजित इंगळे यांनीही आपल्या शैक्षणिक अनुभवातून शिक्षक आणि शिक्षण यांवर भाष्य करून आपल्या भावना व्यक्त केल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पूजा अडोळे हिने तर आभार प्रदर्शन राजकुमार चांदेकर याने केले. कार्यक्रमाला विभागातील विद्यार्थी उपस्थिती होते.
Discussion about this post