
शिरूर तालुका प्रतिनिधी:-
शिरूर तालुक्यातील करडे गावातील माजी सैनिकाच्या पत्नीची आर्थिक फसवणूक प्रकरणात शिरूर पोलिस ठाण्याचे दोन अधिकारी निलंबित करण्यात आले आहेत.
डब्ल्यू स्क्वेअर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (Wsquare Feeds India Private Limited) या कंपनीत भागीदार असलेल्या रेश्मा राहुल वाळके (वय ३७) यांची बनावट कागदपत्रे तयार करून राजीनामा घेतला गेला आणि त्यांना भागीदारीतून वगळण्यात आले. या प्रकरणी २७ जानेवारी २०२५ रोजी शिरूर पोलिस ठाण्यात प्रियंका संभाजी वाळके, संभाजी दगडू वाळके, सचिन संभाजी वाळके आणि इतरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासादरम्यान, सहायक पोलिस निरीक्षक हणमंतराव शिवाजी गिरी आणि पोलिस हवालदार नारायण भिमराव जाधव यांनी आरोपींशी वारंवार संपर्क साधून त्यांना मदत केल्याचे उघड झाले. मोबाईल कॉल तपासणीत, ७ नोव्हेंबर २०२४ ते २९ जानेवारी २०२५ दरम्यान गिरी यांनी आरोपी सचिन वाळके यांना ७९ वेळा कॉल केले होते, तर ३० नोव्हेंबर २०२४ ते २९ जानेवारी २०२५ दरम्यान जाधव यांनी २५ कॉल केले होते. या अनुचित वर्तनामुळे पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक पंकज देशमुख यांनी दोन्ही अधिकाऱ्यांना निलंबित केले आहे. सामान्य नागरिकांनी या कारवाईचे स्वागत केले आहे. एकीकडे पोलिस निरीक्षक संदेश केंजळे आणि तपास अधिकारी पोलिस उपनिरीक्षक सागर शेळके आरोपींच्या शोधात असताना, त्याच पोलिस ठाण्यातील काही अधिकारी आरोपींना मदत करत असल्याने नागरिकांमध्ये नाराजी होती. या निलंबनामुळे इतर पोलिस कर्मचाऱ्यांना धडा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
Discussion about this post