मोहोळ दि.१४(प्रतिनिधी)
सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील आष्टी उपसा सिंचन योजनेतंर्गत पोखरापूर उपसा सिंचन योजना टप्पा क्र. २ कार्यान्वित करण्यात आली आहे. अखेर तीस वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पोखरापूर पाटबंधारे तलावात चार दिवसात पाणी सोडण्याचे आश्वासन भीमा कालवा विभाग व लाभक्षेत्र प्राधिकरणाचे अधिका-यांनी सारोळे येथील आंदोलन स्थळी जनहित शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना दिले.
अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या शेतक-यांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न जनहित शेतकरी संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर देशमुख यांनी सातत्याने पाठपुरावा करून धसास लावला होता. त्यांनी काल शुक्रवारी १२ सप्टेंबर रोजी सारोळे येथील श्री सिद्धेश्वर मंदिरात
ठिय्या आंदोलन सुरू केले होते यावेळी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन सकारात्मक चर्चा केली.अखेर चार दिवसात या योजनेचे पाणी पोखरापूर तलावात सोडण्याचे आश्वासन दिले. शिवाय तातडीने प्रत्यक्ष कामाला आजच सुरुवात करण्याचे मान्य केले. जनहित शेतकरी संघटनेच्या आंदोलनामुळे अखेर पोखरापूर तलावात चार दिवसात पाणी येणार असल्याने पोखरापूर, खवणी व सारोळे या गावच्या शेतक-यामध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.
आष्टी उपसा सिंचन योजनेतून पोखरापूर येथील तलावात पाणी सोडण्याची मागणी शेतकऱ्यांनी सातत्याने सुरू ठेवली होती. यातीन गावच्या नागरिकांनी १९९८ घ
च्या लोकसभा निवडणुकीत मतदानावर बहिष्कार टाकून मतपेट्या रिकाम्या पाठविल्या होत्या.
पोखरापुर उपसा सिंचन योजना टप्पा क्र.२ साठी शासनाने मान्यता दिली होती. २००२ या वर्षात मंजूरी मिळालेल्या या योजनेला अनेक वर्षांपासून सर्व पक्षीय राजकीय , आर्थिक व प्रशासकीय हादरे बसले. परन्तु या तीन गावांतील नागरिकांनी सातत्याने लढा, पाठपुरावा सोडला नाही.तलावात पाणी पुरवठा करण्यात येणा-या पाईपलाईनचे काम पूर्ण झाले तरीही प्रत्यक्षात पाणी पुरवठा करण्यात येत नव्हता. जनहित शेतकरी संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर भैया देशमुख यांनी मौजे सारोळे येथील सिद्धेश्वर मंदिरात शेतकऱ्यांच्या विविध मागण्या घेऊन आंदोलन सुरू केले होते. भीमा कालवा चे अधीक्षक अभियंता ज्ञानेश्वर बागाडे व लाभक्षेत्र प्राधिकरणाचे अधिक्षक अभियंता धीरज साळे व कार्यकारी अभियंता नारायण जोशी यांनी लेखी स्वरूपात ठोस आश्वासन देऊन जनहित शेतकरी संघटनेच्या सर्व मागण्या मान्य केल्या. त्यामुळे तमाम शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेतले.
यावेळी बोलताना प्रभाकर देशमुख म्हणाले की, गेल्या कित्येक वर्षापासून जनहित शेतकरी संघटनेच्या माध्यमातून पाठपुरावा करून आष्टी उपसा सिंचन योजनेचे व कोन्हेरी पासून पेनुर,पाटकुलचे रखडत पडलेल्या कामाला शासनाने सुरुवात करावी,पाटकुल च्या संपादित जमिनीचा मोबदला मिळण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव सादर करावा,मागणी केली आहे. पाटकुल परिसरातील पोपट काळे यांच्या वस्तीपासून कॅनॉलचे काम लवकरात लवकर मार्गी लावावे. आष्टी उपसा सिंचनच्या कॅनालला कॉंक्रिटीकरण करावे.पापरी येथील चेतन गायकवाडच्या राहत्या घराला धक्का न लावता योग्य पद्धतीने काम सुरू करावे, पाटकुलचा डावा कालवा फुटून शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाई रक्कम मिळावी.आदी मागण्या प्रभाकर देशमुख केल्या होत्या.
त्यांच्या सर्व मागण्या मान्य करून अधीक्षक अभियंता साळे यांनी लेखी आश्वासन दिल्याची माहिती प्रभाकर देशमुख यांनी सांगितली.यावेळी सारोळेचे
सरपंच शाहीर सलगर पोखरापूर चे माजी सरपंच किरण वाघमारे, पंजाब करंडे,सचिन शेळके, अमोल कोरे,जगन्नाथ पाथरुट, चंद्रकांत निकम नाना मोरे,बिरू वाघमोडे, हरिभाऊ लोंढे,पेनुरचे अजित वाघमोडे आदी शेतकरी कार्यकर्ते आंदोलनातसहभागी झाले होते. पोखरापूरच्या तलावात चार दिवसात पाणी पोहोचणार असल्याने सर्वत्र उत्साह आनंदाचे वातावरण पसरले आहे. पोखरापूर खवणी, सारोळे या तीन गावच्या शेतकऱ्यांनी जनहित संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर देशमुख व त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांचा सत्कार श्री सिद्धेश्वर मंदिर सारोळे येथे करण्यात आला.
Discussion about this post