पाथरी (प्रतिनिधी : अहमद अन्सारी, परभणी)
पाथरी तालुक्यातील बाभळगाव येथे रमजान महिन्यात पहाटेच्या वेळेस होणाऱ्या वीज खंडितामुळे मुस्लिम बांधवांना अडचणींचा सामना करावा लागत असल्याने लोडशेडिंग टाळण्याची मागणी करण्यात आली आहे. यासाठी बाभळगावचे सामाजिक कार्यकर्ते सिकंदर हाफिज शेख यांनी वीज वितरण विभागाला निवेदन सादर केले.
रमजान महिन्यात रोजा पाळणाऱ्या मुस्लिम बांधवांना पहाटे ‘सहरी’साठी अन्न तयार करावे लागते. मात्र या वेळेस वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे रमजान महिन्याभर अखंडित वीजपुरवठा करण्यात यावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
सदर निवेदन महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित कार्यालयात सादर करण्यात आले असून प्रशासनाने सहानुभूतीपूर्वक विचार करून योग्य ती कार्यवाही करावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
— सिकंदर शेख, बाभळगावकर
पत्रकार संरक्षण समिती, तालुका संघटक पाथरी







