शहादा, दि. २४ (का.प्र.)
गुजरात राज्यातील निझर येथील रहिवासी जगदीशभाई रघुनाथभाई पटेल यांची अखिल भारतीय गुर्जर महासभाच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. या निवडीची घोषणा महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपकभाई पुरुषोत्तम पाटील आणि राष्ट्रीय सरचिटणीस बच्चूसिंह बैसला यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
महासभेच्या विविध पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या नुकत्याच जाहीर करण्यात आल्या असून त्यामध्ये जगदीशभाई पटेल यांची राष्ट्रीय महामंत्री म्हणून निवड करण्यात आली आहे. सामाजिक क्षेत्रात त्यांनी रक्तदान शिबिरे, आरोग्य शिबिरे, आरोग्यविषयक चर्चासत्रे तसेच विविध सामाजिक उपक्रम राबवून उल्लेखनीय कार्य केले आहे. त्यांच्या सातत्यपूर्ण सामाजिक योगदानाची दखल घेत त्यांची या महत्त्वाच्या पदावर निवड करण्यात आल्याचे सांगण्यात आले.
जगदीशभाई पटेल यांच्या निवडीबद्दल राष्ट्रीय अध्यक्ष दीपकभाई पाटील, राष्ट्रीय संघटन सरचिटणीस बच्चूसिंह बैसला तसेच गुजरात राज्याचे अध्यक्ष मोहनभाई पटेल आणि समाजातील विविध मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.
दरम्यान, आपल्या निवडीबद्दल बोलताना जगदीशभाई पटेल यांनी राष्ट्रीय अध्यक्ष आणि राष्ट्रीय सरचिटणीस यांनी दाखविलेल्या विश्वासाबद्दल आभार व्यक्त केले. सोपविलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडत समाजहितासाठी विविध सामाजिक उपक्रम पुढेही राबविण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.






