कोळनुर | प्रतिनिधी
कोळनुर येथील शेतकरी चोले यांच्या घोडीला घरासमोरील विद्युत तारेचा स्पर्श झाल्याने जोरदार विजेचा धक्का बसला. या घटनेत घोडी अचानक जमिनीवर कोसळली. मात्र, वेळेत उपचार मिळाल्याने तिचा जीव वाचविण्यात यश आले.
मिळालेल्या माहितीनुसार, सतत सुरू असलेल्या पावसामुळे परिसरात विद्युत प्रवाहाचा धोका निर्माण झाला होता. घरासमोरील विद्युत जोडणीच्या तारेचा घोडीला स्पर्श झाल्याने तिला तीव्र विजेचा धक्का बसला आणि ती बेशुद्ध होऊन खाली पडली.
घटनेची माहिती मिळताच डॉ. कलवले यांच्याशी तात्काळ संपर्क साधण्यात आला. त्यांनी घटनास्थळी पोहोचून घोडीवर त्वरित आणि योग्य उपचार केले. त्यांच्या तत्परतेमुळे घोडीचा जीव वाचला.
या प्रसंगानंतर गावकऱ्यांनी डॉ. कलवले यांच्या सेवाभावी कार्याचे कौतुक करत त्यांचे अभिनंदन केले. तसेच पावसाळ्यात उघड्या किंवा सैल झालेल्या विद्युत तारा नागरिकांसह जनावरांसाठीही धोकादायक ठरत असल्याने संबंधित वीज वितरण विभागाने अशा ठिकाणांची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली.
“पशुसेवा हीच ईश्वर सेवा” या उक्तीची प्रचिती या घटनेतून आल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.
