बांबवडे | प्रतिनिधी
माले (ता. पन्हाळा) येथील युवा खेळाडूंनी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन करत गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. नुकत्याच पार पडलेल्या भारतीय खेल प्राधिकरण (Sports Authority of India – SAI) सेंटरच्या निवड चाचणीत माले येथील अनेक होतकरू खेळाडूंची निवड झाली आहे.
या निवड प्रक्रियेत प्रणाली चौगुले, हर्षदा चौगुले, अनुष्का पाटील, साक्षी हिरवे आणि अक्षरा पाटील यांनी उत्कृष्ट कामगिरी करत ‘साई’ सेंटरमध्ये स्थान मिळवले. त्यांच्या यशाची दखल घेत सेंटरतर्फे सरावासाठी आवश्यक असलेले स्पोर्ट्स किट व इतर क्रीडा साहित्य त्यांना प्रदान करण्यात आले.
क्रीडा साहित्य वितरण कार्यक्रमाला सेंटरचे पदाधिकारी, प्रशिक्षक तसेच मान्यवर उपस्थित होते. या उपक्रमामुळे खेळाडूंना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध होणार असून त्यांच्या पुढील वाटचालीला बळ मिळणार आहे.
भारतीय खेल प्राधिकरणाकडून मिळालेल्या या प्रोत्साहनामुळे खेळाडूंचा आत्मविश्वास वाढला असून भविष्यात राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कामगिरी करून माले गावाचे नाव उज्ज्वल करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
या यशाबद्दल निवड झालेल्या सर्व खेळाडू, त्यांचे पालक आणि प्रशिक्षक यांचे परिसरातून अभिनंदन होत असून, ग्रामीण भागातील क्रीडा प्रतिभेला मिळालेल्या या संधीचे सर्वत्र स्वागत होत आहे.
