निबंध व धावण्याच्या स्पर्धांना ९० स्पर्धकांचा सहभाग; २९ नोव्हेंबरला विजेत्यांना पारितोषिक वितरण
पिंपळदरी :
गावाच्या विकासासोबतच युवकांना क्रीडा क्षेत्रात प्रोत्साहन देणे आणि विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कलागुणांना संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने पिंपळदरी येथे विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. सरपंच बंडू ठाकरे यांच्या संकल्पनेतून भगवान बिरसा मुंडा जयंतीनिमित्त शैक्षणिक आणि क्रीडा स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धांमध्ये एकूण ९० स्पर्धकांनी सहभाग नोंदविला.
या उपक्रमांतर्गत शाळकरी विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धा, तर गावातील युवकांसाठी प्रथमच धावण्याच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धांना विद्यार्थी आणि युवकांचा प्रतिसाद मिळाला. युवकांमध्ये क्रीडाप्रेम, शारीरिक तंदुरुस्ती आणि स्पर्धात्मक वृत्ती वाढविणे, तसेच विद्यार्थ्यांना शैक्षणिक कौशल्ये सादर करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा या उपक्रमामागील उद्देश आहे.
२६ नोव्हेंबर रोजी संविधान दिनानिमित्तही गावात शैक्षणिक आणि सामाजिक उपक्रमांना प्रोत्साहन देण्यात आले. २९ नोव्हेंबर रोजी भगवान बिरसा मुंडा जयंतीच्या मुख्य कार्यक्रमात विविध स्पर्धांतील विजेत्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पारितोषिकांचे वितरण करण्यात येणार आहे.
ग्रामविकासासोबतच युवक आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अशा उपक्रमांचे आयोजन करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. पिंपळदरी ग्रामपंचायतीच्या या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील युवकांना आपले कौशल्य दाखविण्यासाठी संधी उपलब्ध झाली आहे.









