
तळोदा प्रतिनिधी | सारथी महाराष्ट्राचा न्यूज
नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा येथे युवा क्रांती फाउंडेशनच्या जिल्हा टीमने एका बेकरीची पाहणी करताना अस्वच्छतेचे गंभीर प्रकार आढळल्याचा दावा केला आहे. पाहणीदरम्यान बेकरीच्या किचनमध्ये ठेवलेल्या पिठावर माश्या बसलेल्या दिसल्या, तसेच विक्रीसाठी ठेवलेल्या पावावरही माश्या आढळल्याने अन्नसुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
युवा क्रांती फाउंडेशनचे संस्थापक व राष्ट्रीय अध्यक्ष रविंद्र सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या जनहित मोहिमेअंतर्गत तळोदा येथील पदाधिकारी भालचंद्र चित्ते, हरीश पाटील, काशिनाथ कोळी आणि विनोद चौधरी यांनी संबंधित बेकरीची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी स्वच्छतेच्या नियमांचे पालन होत नसल्याचे निदर्शनास आल्याचा आरोप करण्यात आला. याबाबत संबंधित बेकरी चालकाला जाबही विचारण्यात आला.
याप्रसंगी रविंद्र सूर्यवंशी यांनी सांगितले की, नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या अशा प्रकारांना कोणतीही पाठीशी घालण्यात येणार नाही. संबंधित प्रशासनाकडे लेखी तक्रार करून दोषींवर कायद्यानुसार कठोर कारवाई व्हावी, यासाठी संस्था सातत्याने पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
युवा क्रांती फाउंडेशनने नागरिकांनाही आवाहन केले आहे की, परिसरातील बेकरी किंवा खाद्यपदार्थ तयार करणाऱ्या ठिकाणी अस्वच्छता आढळल्यास संबंधित प्रशासनाला माहिती द्यावी आणि कायद्याच्या चौकटीत राहून जनहितासाठी सहकार्य करावे.
दरम्यान, नंदुरबार जिल्हा तळोदा टीमने राबविलेल्या या जनहिताच्या उपक्रमाचे संस्थापक रविंद्र सूर्यवंशी यांनी कौतुक करत सर्व पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले. नागरिकांच्या आरोग्याच्या संरक्षणासाठी अशा तपासणी मोहिमा पुढेही अधिक प्रभावीपणे राबविण्यात येतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
