लातूर | प्रतिनिधी
लातूर शहरातील वैद्यकीय क्षेत्राला मोठा धक्का देणारी घटना बुधवारी समोर आली. एम.जे. हॉस्पिटलचे संचालक व प्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ डॉ. मेहुल ईश्वर राठोड यांचे निधन झाल्याची माहिती समोर आली असून, या घटनेमुळे वैद्यकीय क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, डॉ. राठोड यांच्याशी संपर्क होत नसल्याने कुटुंबीय व रुग्णालयातील सहकाऱ्यांनी त्यांचा शोध घेतला. त्यानंतर लातूर–आंबाजोगाई मार्गावरील एका परिसरात त्यांची कार आढळून आली. त्यांना तातडीने वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आले; मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
या प्रकरणाची नोंद एमआयडीसी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून करण्यात आली असून, मृत्यूचे नेमके कारण अधिकृत तपास आणि वैद्यकीय अहवालानंतर स्पष्ट होणार असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
दरम्यान, काही माध्यमांमध्ये मृत्यूच्या कारणाबाबत विविध दावे करण्यात येत असले तरी त्यासंदर्भात अधिकृत पुष्टी झालेली नाही. पोलिसांकडून सर्व बाबींचा तपास सुरू आहे.
डॉ. मेहुल राठोड यांनी हृदयरोग उपचार क्षेत्रात केलेल्या योगदानामुळे त्यांना रुग्ण आणि वैद्यकीय क्षेत्रात विशेष मान होता. त्यांच्या निधनामुळे वैद्यकीय क्षेत्रात शोककळा पसरली आहे.
