
📰 सारथी महाराष्ट्राचा न्यूज | बार्शी | प्रतिनिधी
माजी मंत्री तथा आमदार दिलीप सोपल यांच्या बंगला परिसरात स्फोटक स्वरूपाचे जळते फटाके टाकून आग लावण्याचा प्रयत्न केल्याच्या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या प्रशांत उर्फ पेशा रणझुंजारे, निखिल उर्फ अंबादास भरत रणझुंजारे आणि नागेश बाळू मोहिते या तिन्ही आरोपींचा नियमित जामीन अर्ज बार्शी येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश सूरज व्ही. केंद्रे यांनी फेटाळला आहे.
यापूर्वी या प्रकरणातील आरोपींना न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. त्यावेळी न्यायिक दंडाधिकारी पी. व्ही. राऊत यांनी आदेश दिला होता. सुनावणीदरम्यान सरकार पक्षातर्फे ॲड. राहुल काजळे, फिर्यादी सुधीर सोपल यांच्या वतीने ॲड. विकास जाधव, तर आरोपींच्या वतीने ॲड. महेश जगताप यांनी बाजू मांडली होती. तपासी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक बाळासाहेब जाधव न्यायालयात उपस्थित होते.
यानंतर अतिरिक्त सत्र न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या फौजदारी जामीन अर्ज क्रमांक ५३१/२०२६ वर सुनावणी झाली. आरोपींच्या वतीने ॲड. महेश जगताप, सरकार पक्षाच्या वतीने अतिरिक्त सरकारी अभियोक्ता ॲड. दिनेश देशमुख, तर फिर्यादीच्या वतीने ॲड. विकास जाधव आणि ॲड. प्रशांत घोडके यांनी युक्तिवाद केला.
न्यायालयाने उपलब्ध कागदपत्रे, पोलिस तपासातील नोंदी आणि दोन्ही बाजूंचे युक्तिवाद विचारात घेत जामीन अर्ज फेटाळला. आदेशात नमूद करण्यात आले की, आरोपींनी जामीन अर्जात गुन्हेगारी पूर्वइतिहास नसल्याचे म्हटले असले, तरी त्यांनीच सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात प्रत्येकी चार गुन्हे नोंद असल्याचे नमूद असून न्यायालयाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न झाल्याचे दिसून येते.
तसेच गुन्ह्याचे गांभीर्य, तपास अद्याप सुरू असणे, इतर आरोपी फरार असणे आणि आरोपी जामिनावर सुटल्यास साक्षीदारांवर दबाव आणणे, पुराव्यांमध्ये छेडछाड करणे किंवा तपासात अडथळा निर्माण करण्याची शक्यता लक्षात घेऊन न्यायालयाने नियमित जामीन अर्ज फेटाळला. हा आदेश दि. १६ जुलै २०२६ रोजी पारित करण्यात आला असून, या प्रकरणातील उर्वरित आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत.

