
संगमनेर प्रतिनिधी
संगमनेर तालुक्यातील मौजे रहिमपूर येथील भि. आं. शिंदे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयासाठी शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या माध्यमातून १० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून, या निधीतून उभारण्यात येणाऱ्या दोन नवीन वर्गखोल्यांच्या कामास प्रारंभ झाला आहे.
काही दिवसांपूर्वी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी विद्यालयाला भेट दिली होती. त्यावेळी विद्यार्थ्यांची वाढती संख्या लक्षात घेता अतिरिक्त वर्गखोल्यांची गरज असल्याचे ग्रामस्थांनी त्यांच्या निदर्शनास आणून दिले होते. यावेळी खासदारांनी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले होते.
स्थानिक कार्यकर्त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर निधी मंजूर झाला असून, वर्गखोल्यांच्या बांधकामाला प्रत्यक्ष सुरुवात करण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थी, शिक्षक आणि ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून, ग्रामस्थांनी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांचे आभार मानले.
यावेळी इंद्रजित थोरात, रोहित वाकचौरे, संस्थेचे व्हा. चेअरमन संदीप शिंदे, मुकुंद सिनगर, आबासाहेब शिंदे, सोमनाथ बा. शिंदे, भाऊसाहेब शिंदे, धनंजय शिंदे, रामनाथ शिंदे, सरुनाथ शिंदे, बाजीराव वाळुंज, अण्णासाहेब शिंदे, दत्तू खुले, सूरज शिंदे पाटील यांच्यासह शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नवीन वर्गखोल्यांमुळे विद्यार्थ्यांना अधिक चांगल्या शैक्षणिक सुविधा उपलब्ध होणार असून, विद्यालयाच्या शैक्षणिक विकासाला चालना मिळणार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.



