माजी उपसभापतींच्या मध्यस्थीने कारला येथील प्रश्न मार्गी
प्रदिप ताजने
पातूर| प्रतिनिधी |
कार्ला: घरापर्यंत जाण्यासाठी रस्ता नसल्याने ग्रामपंचायत कार्यालयासमोर सुरू केलेले उपोषण अखेर लिखित आश्वासनानंतर मागे घेण्यात आले.
येथील प्रतिभाताई बोदडे यांच्या घरापर्यंत जाण्यासाठी रस्ता नसल्यामुळे त्यांना नित्याच्या येण्या-जाण्यात अडचणी येत होत्या. रस्त्याच्या जागेत सत्यभामा ताई तेलगोटे यांचे अतिक्रमण असल्याने हा प्रश्न ऐरणीवर आला होता.
या समस्येच्या निवारणासाठी प्रतिभाताई यांनी दि. 14 ऑगस्ट 2026 रोजी ग्रामपंचायत कार्यालय, कार्ला येथे उपोषण सुरू केले होते.
उपोषणाची माहिती मिळताच मा. उपसभापती इमरान खान यांनी घटनास्थळी भेट देऊन दोन्ही पक्षांशी चर्चा केली. त्यांनी तेलगोटे ताई यांना रस्त्यासाठी जागा उपलब्ध करून देण्याची विनंती केली. यावेळी तेलगोटे ताईंनी मोठे मन दाखवत रस्त्यासाठी असलेली भिंत लवकरच तोडून जागा मोकळी करून देण्याचे मान्य केले.
लिखित आश्वासनानंतर तोडगा
तेलगोटे ताईंनी प्रतिभाताई बोदडे यांना रस्ता लवकरात लवकर मोकळा करून देण्याचे लिखित आश्वासन दिले. यानंतर मा. उपसभापती इमरान खान, कार्ला
गावचे सरपंच व इतर मान्यवर ग्रामस्थांच्या उपस्थितीत प्रतिभाताई बोदडे यांचे उपोषण सोडविण्यात आले.
या तोडग्यामुळे गावातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.











