गडचिरोली
चामोर्शी ग्रामीण रुग्णालयातील मृत्यू झालेली महिली (डावीकडे) आणि आमदार डॉ. मिलिंद नरोटे
गडचिरोली : चामोर्शी ग्रामीण रुग्णालयात प्रसूतीनंतर माता आणि नवजात बाळाचा मृत्यू झाल्याच्या घटनेनंतर गडचिरोली विधानसभा मतदारसंघातील आरोग्य व्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. विशेष म्हणजे चामोर्शी, धानोरा आणि गडचिरोली हे तिन्ही तालुके या मतदारसंघात येतात आणि या मतदारसंघाचे आमदार मिलिंद नरोटे हे स्वतः डॉक्टर आहेत. असे असतानाही या भागातील आरोग्य व्यवस्थेतील त्रुटींच्या तक्रारी आणि गंभीर घटना वारंवार समोर येत असल्याने केवळ सूचना देऊन प्रश्न सुटणार आहेत का, असा सवाल उपस्थित होत आहे.
चामोर्शी येथील जिजा सातर यांच्या मृत्यूच्या घटनेने या प्रश्नाला पुन्हा एकदा वाचा फुटली आहे. पहिल्या प्रसूतीसाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल झालेल्या जिजा यांना वेळेवर स्त्रीरोगतज्ज्ञ उपलब्ध न झाल्याचा आरोप नातेवाइकांनी केला. त्यानंतर त्यांना दुसऱ्या रुग्णालयात हलविण्यात आले. प्रसूतीनंतर नवजात बाळाचा मृत्यू झाला, तर काही तासांनी जिजा यांचाही मृत्यू झाला. या घटनेत नेमकी वैद्यकीय किंवा प्रशासकीय चूक कुठे झाली, याचा तपास होणे आवश्यक आहे. मात्र, त्याचवेळी ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणेची प्रत्यक्ष स्थितीही तपासण्याची गरज निर्माण झाली आहे.
गडचिरोली विधानसभा मतदारसंघात चामोर्शी आणि धानोरा यांसारखे दुर्गम तालुके येतात. ग्रामीण आणि आदिवासी भागातील नागरिकांसाठी प्राथमिक आरोग्य केंद्रे, ग्रामीण रुग्णालये आणि उपजिल्हा रुग्णालये हीच मोठी आधारव्यवस्था आहे. अशा ठिकाणी तज्ज्ञ डॉक्टरांची उपलब्धता, वेळेवर संदर्भसेवा, आवश्यक मनुष्यबळ आणि आपत्कालीन उपचार यंत्रणा सक्षम असणे अपेक्षित आहे. प्रत्यक्षात मात्र या व्यवस्थेतील त्रुटींच्या तक्रारी अधूनमधून नव्हे, तर वारंवार पुढे येत आहेत.
सूचना होतात; मग अंमलबजावणी कुठे?
चामोर्शीतील घटनेनंतर आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनी आरोग्य विभागाला वारंवार सूचना देऊनही काही जण आरोग्य व्यवस्थेत सुधारणा करण्यास तयार नसल्याने अशा घटना घडत असल्याचे म्हटले आहे. मात्र, हा मुद्दा केवळ संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणापुरता मर्यादित ठेवणे पुरेसे ठरणार नाही. लोकप्रतिनिधी म्हणून आरोग्य व्यवस्थेतील त्रुटी दूर करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा आणि त्याच्या परिणामकारक अंमलबजावणीवर देखरेख ठेवण्याची जबाबदारीही महत्त्वाची आहे.
गंभीर घटना घडल्यानंतर चौकशी आणि कारवाईचे आश्वासन देण्यापेक्षा अशा घटना घडू नयेत यासाठी यंत्रणा सक्षम करण्याची गरज आहे. विशेषतः प्रसूतीसारख्या संवेदनशील सेवांमध्ये डॉक्टरांची उपलब्धता, आपत्कालीन निर्णयक्षमता आणि रुग्णाला वेळेत उच्चस्तरीय उपचार मिळण्याची व्यवस्था याबाबत स्पष्ट उत्तरदायित्व निश्चित होणे आवश्यक आहे.
तीन तालुक्यांच्या आरोग्य व्यवस्थेची बैठक घेणार
आमदार डॉ. नरोटे यांनी या घटनेच्या पार्श्वभूमीवर चामोर्शी, धानोरा आणि गडचिरोली या तिन्ही तालुक्यांतील आरोग्य विभागाची बैठक घेण्यात येणार असल्याचे सांगितले आहे. यापुढे आरोग्य व्यवस्थेकडे दुर्लक्ष होणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात येतील, असे त्यांनी स्पष्ट केले. या बैठकीत केवळ चामोर्शीतील घटनेपुरता आढावा न घेता तिन्ही तालुक्यांतील डॉक्टरांची उपलब्धता, रिक्त पदे, प्रसूती सेवा, आपत्कालीन उपचार, रुग्णवाहिका व्यवस्था, संदर्भ रुग्णालयांशी समन्वय आणि औषधसाठा यांचा वस्तुनिष्ठ आढावा घेतला जाणे अपेक्षित आहे. अन्यथा बैठका, सूचना आणि आश्वासने यापलीकडे आरोग्य व्यवस्थेत फारसा बदल होणार नाही, अशी भीती व्यक्त होत आहे.
दोषींची गय केल्या जाणार नाही.
चामोर्शीतील माता-बाळ मृत्यूची घटना अत्यंत दुर्दैवी आहे. आरोग्य विभागात सुधारणा करण्याबाबत वारंवार सूचना देऊनही काही जण त्याची अंमलबजावणी करण्यास तयार नसल्याने अशा घटना घडत आहेत. या प्रकरणात दोषी कोणाचीही गय केली जाणार नाही. मी स्वतः मुख्यमंत्री यांच्याशी या प्रकरणी बोललो आहे. लवकरच दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, यासाठी माझा आग्रह राहील. चामोर्शी, धानोरा आणि गडचिरोली या तिन्ही तालुक्यांतील आरोग्य विभागाची बैठक घेऊन यापुढे दुर्लक्ष होणार नाही, याबाबत आवश्यक सूचना व आदेश देण्यात येतील. — डॉ. मिलिंद नरोटे, आमदार गडचिरोली.






