अलिबाग : अलिबाग तालुक्यातील दिघोडी गावाला निसर्गरम्य समुद्रकिनारा लाभला असून, या ठिकाणी गावातील महिला, लहान मुले तसेच बाहेरून येणारे पर्यटक ताजी हवा घेण्यासाठी आणि विरंगुळ्यासाठी मोठ्या संख्येने येत असतात. मात्र, याच सार्वजनिक समुद्रकिनारी काही मद्यपींकडून उघडपणे दारूचे सेवन करून परिसरात बाटल्या व इतर कचरा टाकला जात असल्याने संताप व्यक्त होत आहे.
समुद्रकिनाऱ्यालगत लहान मुलांसाठी खेळणी व झोके बसविण्यात आले आहेत. त्यामुळे लहान मुले खेळण्यासाठी येथे येतात. मात्र, याच ठिकाणी काही व्यसनी व्यक्ती दारूच्या बाटल्या उघड्यावर टाकून जात असल्याने परिसराचे विद्रूपीकरण होत आहे. सार्वजनिक ठिकाणी अशा प्रकारे मद्यपान करून बाटल्या टाकणे ही अत्यंत निंदनीय व बेजबाबदारपणाची बाब असल्याची प्रतिक्रिया ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे.
दिघोडी समुद्रकिनाऱ्याचे नैसर्गिक सौंदर्य आणि स्वच्छता अबाधित राहण्यासाठी ग्रामपंचायत तसेच संबंधित प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष देऊन मद्यपींवर कारवाई करावी आणि समुद्रकिनारी नियमित स्वच्छता व देखरेख ठेवावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.






