पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक बांधिलकी जपत ‘वृक्षारोपण व संवर्धन संकल्प ग्रुप, शहादा’ यांच्या वतीने कुकडेल (संभाजी नगर परिसर) येथे मोठ्या उत्साहात वृक्षारोपण करण्यात आले. केवळ झाडे लावणे नव्हे, तर लावलेल्या रोपांचे संवर्धन आणि योग्य निगा राखण्याचा संकल्प यावेळी उपस्थित सदस्यांनी केला.
सदर ग्रुप मागील ११ वर्षांपासून केवळ पर्यावरण क्षेत्रातच नव्हे, तर सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य आणि जन जागृती यांसारख्या विविध लोकोपयोगी उपक्रमांमध्ये अविरतपणे अग्रेसर राहून काम करत आहे. वाढत्या प्रदूषणावर मात करण्यासाठी आणि परिसरातील हिरवळ वाढवण्यासाठी अशा उपक्रमांची नितांत गरज असल्याचे प्रतिपादन ग्रुपच्या सदस्यांनी केले.
या वृक्षारोपण मोहिमेत ग्रुपचे पदाधिकारी, सदस्य आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी श्रमदान करत रोपांची लागवड केली व त्यांना पाणी घालून संरक्षणाची जबाबदारी स्वीकारली. पर्यावरणपूरक कार्याची ही ११ वर्षांची परंपरा अखंडपणे सुरू ठेवल्याबद्दल परिसरातील नागरिकांकडून ग्रुपचे विशेष कौतुक करण्यात येत आहे.





