
ढगेवाडी फाटा : येथील परिसरात मध्यरात्री बिबट्याने केलेल्या हल्ल्यात पशुपालक कुबेर काळुगडे यांच्या चार शेळ्या ठार झाल्याची घटना घडली. या घटनेमुळे परिसरातील नागरिक, शेतकरी आणि पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रात्रीच्या सुमारास बिबट्याने शेळ्यांच्या ठिकाणी हल्ला केला. या हल्ल्यात दोन शेळ्या घटनास्थळीच मृतावस्थेत आढळून आल्या, तर अन्य दोन शेळ्यांना बिबट्याने जवळच्या रानात ओढून नेल्याचे सकाळी निदर्शनास आले.
सकाळी हा प्रकार उघडकीस येताच परिसरात खळबळ उडाली. बिबट्याच्या वाढत्या वावरामुळे पशुपालकांमध्ये चिंतेचे वातावरण असून, रात्रीच्या वेळी जनावरांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे.
या घटनेची वनविभागाने तातडीने दखल घेऊन घटनास्थळाची पाहणी करावी, बिबट्याचा वावर असलेल्या परिसरात आवश्यक उपाययोजना कराव्यात तसेच नुकसानग्रस्त पशुपालकाला नियमानुसार मदत व भरपाई मिळावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
दरम्यान, परिसरातील नागरिकांनी व पशुपालकांनी रात्रीच्या वेळी विशेष दक्षता घ्यावी आणि बिबट्याचा वावर आढळल्यास तातडीने वनविभागाला माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे.








