
नातेवाईकांसह बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांचे ठिय्या आंदोलन; चौकशी करून कारवाईचे प्रशासनाचे आश्वासन
सारथी महाराष्ट्राचा न्यूज नेटवर्क
नवी मुंबई प्रतिनिधी :
नवी मुंबई : वाशी येथील नवी मुंबई महापालिका रुग्णालयात उपचारासाठी दाखल असलेल्या रुग्णाला मुदतबाह्य सलाईन लावल्याने त्याची प्रकृती खालावल्याचा गंभीर आरोप नातेवाईकांनी केला आहे. प्रकृती बिघडल्यानंतर रुग्णाला पुढील उपचारासाठी खासगी रुग्णालयात हलविण्यात आले असून, सध्या त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. या प्रकाराची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, या मागणीसाठी रुग्णाच्या नातेवाईकांसह बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी वाशी रुग्णालयात ठिय्या आंदोलन केले.
गोपीराम खडसे (वय ५०) यांना ३१ ऑगस्ट रोजी ताप आणि चक्कर येत असल्याने वाशी महापालिका रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. प्राथमिक उपचारानंतर त्यांना वॉर्डमध्ये दाखल करण्यात आले. १ सप्टेंबर रोजी सकाळपासून दुपारपर्यंत त्यांची प्रकृती स्थिर होती. मात्र, त्यानंतर अचानक प्रकृती खालावल्याने त्यांना पुढील उपचारासाठी हिरानंदानी (फोर्टीस) रुग्णालयात हलविण्यात आले.
उपचारादरम्यान खडसे यांना मुदत संपलेली सलाईन लावण्यात आल्याचे नंतर निदर्शनास आल्याचा दावा त्यांच्या नातेवाईकांनी केला आहे. सलाईन लावल्यानंतर प्रकृती खालावत गेल्याने त्यांना अतिदक्षता विभागात दाखल करावे लागल्याचेही नातेवाईकांचे म्हणणे आहे. रुग्णालयातील संबंधित डॉक्टर व कर्मचाऱ्यांकडे तक्रार करूनही वेळीच दखल घेतली नसल्याचा आरोप त्यांनी केला.
या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर नातेवाईकांसह बजरंग दलाचे कार्यकर्ते रुग्णालयात दाखल झाले. मुदतबाह्य सलाईन लावण्यास जबाबदार असलेल्या व्यक्तीवर तातडीने कारवाई करावी तसेच रुग्णाच्या उपचाराची जबाबदारी महापालिका प्रशासनाने घ्यावी, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.
चौकशी करून कारवाईचे प्रशासनाचे आश्वासन
वाशी रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. रवींद्र म्हात्रे यांनी सांगितले की, गोपीराम खडसे यांना ३१ ऑगस्ट रोजी ताप व चक्कर येत असल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दुसऱ्या दिवशी दुपारनंतर त्यांची प्रकृती खालावल्याने पुढील उपचारासाठी त्यांना महापालिकेच्या कोट्यातून हिरानंदानी (फोर्टीस) रुग्णालयात हलविण्यात आले.
मुदतबाह्य सलाईन लावल्याबाबत नातेवाईकांनी तक्रार केली असून, या तक्रारीची चौकशी करून योग्य ती कारवाई केली जाईल. याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही माहिती देण्यात आल्याचे डॉ. म्हात्रे यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, नवी मुंबई महापालिकेच्या आरोग्य समितीचे सभापती डॉ. जयाजी नाथ यांनी दिलेल्या माहितीनुसार, रुग्णाला डेंग्यूची लागण झाल्याचे सांगण्यात आले असून, त्यांच्या रक्तातील प्लेटलेट्सची संख्या सुमारे ४० हजारांपर्यंत घटली होती. त्यामुळेही प्रकृती गंभीर होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली. सलाईन लावल्यानंतर तत्काळ त्रास झालेला नसल्याने प्रकृती खालावण्याचे कारण केवळ मुदतबाह्य सलाईन आहे, असे सध्या ठामपणे सांगता येणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मात्र, मुदतबाह्य सलाईन किंवा औषध रुग्णाला देणे ही गंभीर निष्काळजीपणाची बाब असल्याचे डॉ. नाथ यांनी सांगितले. सलाईन कशी आणि कोणाच्या निष्काळजीपणामुळे लावण्यात आली, याची चौकशी करण्यात येईल. चौकशीत दोषी आढळणाऱ्यांवर योग्य ती कारवाई केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
एकात्मिक आरोग्य धोरणाच्या पार्श्वभूमीवर प्रश्नचिन्ह
नवी मुंबई महापालिकेने शहरातील आरोग्यव्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी एकात्मिक आरोग्य सुविधा व व्यवस्थापन धोरण राबविण्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे. महापालिका रुग्णालयांमधील आरोग्यसेवा सक्षम करण्याचा दावा होत असतानाच वाशी मनपा रुग्णालयातील या कथित प्रकारामुळे औषधसाठा व्यवस्थापन, औषधांची मुदत तपासण्याची प्रक्रिया आणि रुग्णांच्या उपचारातील देखरेख याबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत.
दरम्यान, मुदतबाह्य सलाईनचा आरोप नेमका कितपत खरा आहे आणि रुग्णाची प्रकृती खालावण्यामागील कारण काय, हे चौकशीनंतर स्पष्ट होणार आहे.









