श्रीगोंदा : प्रतिनिधी
श्रीगोंदा मतदार संघाचे लोकप्रतिनिधी आमदार विक्रम पाचपुते यांनी आज आढळगाव केंद्रातील विविध शाळांना भेटी देऊन तेथील समस्या जाणून घेतल्या . या दौऱ्यादरम्यान त्यांनी शालेय विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधला. तसेच शाळा व्यवस्थापन समिती आणि शिक्षकांच्या अडचणी ऐकून घेतल्या.या सर्व समस्या शासनदरबारी मांडून त्या लवकरात लवकर सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला जाईल ,असे आश्वासन आमदार पाचपुते यांनी दिले.
वर्ग खोल्या कमी असल्याबाबत आमदार पाचपुते यांना निवेदन
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आढळगाव येथे भेट दिली असता , शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने अध्यक्ष गणेश गाढवे ,प्रभारी मुख्याध्यापक शिंदे सर व त्यांचे सहकारी शिक्षकांनी आमदार पाचपुते यांची भेट घेऊन शाळेत वर्ग खोल्या कमी असल्यामुळे विद्यार्थ्यांना बसण्यासाठी अडचण येत असल्याचे त्यांनी आमदारांच्या निदर्शनास आणून दिले आणि या समस्येबाबत त्यांना एक मागणीचे निवेदन दिले. आमदारांनी हे निवेदन स्वीकारून यावर तातडीने सकारात्मक पावले उचलण्याचे आश्वासन दिले.
विद्यार्थ्यांशी संवाद आणि शालेय पोषण आहाराची चव
आढळगाव केंद्रातील सर्व जिल्हा परिषद शाळांची पाहणी केल्यानंतर , आमदार पाचपुते यांनी रयत शिक्षण संस्थेचे पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालयाला भेट दिली. तेथे त्यांनी विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद साधत त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या. मुख्याध्यापक घालमे सर व शिक्षकांशी विविध शैक्षणिक विषयावर चर्चा केल्यानंतर ,आमदार पाचपुते यांनी शाळांमध्ये विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या शालेय पोषण आहाराची (जेवण ) स्वतः चव घेऊन पाहणी केली. तसेच शाळेच्या गोदामात जाऊन तांदूळ व इतर धन्यादी मालाची बारकाईने पाहणी केली.
या महत्वपूर्ण पाहणी दौऱ्याप्रसंगी त्यांचे समवेत गटविकास अधिकारी राणीताई फराटे,सुभाषशेठ गांधी,पत्रकार उत्तम राऊत,पत्रकार शरद शिंदे,शरद जमदाडे,अमर छत्तीसे,मिलिंद दरेकर स्थानिक राजकीय कार्यकर्ते,शालेय व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी,ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आमदारांच्या या दौऱ्यामुळे शाळांच्या रखडलेल्या समस्या मार्गी लागतील ,अशी आशा नागरिकांनी व्यक्त केली .











