राहुल राठोड
तालुका पातूर प्रतिनिधी…..
पातूर : दि. २ सप्टेंबर २०२६ रोजी रक्षाबंधनाच्या पवित्र सणाचे औचित्य साधून समाजाच्या सुरक्षिततेसाठी अहोरात्र कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस बांधवांप्रती कृतज्ञता आणि स्नेह व्यक्त करण्यासाठी आयोजित करण्यात आलेला ‘एक राखी पोलीस बांधवांसाठी’ सामाजिक उपक्रम पातूर पोलीस स्टेशन येथे उत्साहात संपन्न झाला.
द प्रोफेशनल करिअर बहुउद्देशीय शैक्षणिक संस्था, पातूर व ग्रामीण युवा संघटना, तुलंगा बु. यांच्या संयुक्त विद्यमाने या सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पोलीस बांधवांना राखी बांधून त्यांच्याप्रती आदर, प्रेम व कृतज्ञतेची भावना व्यक्त करण्यात आली.
पातूर पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक रामकृष्ण जाधव, पी. एस. आय सुहास गोसावी, पी. एस. आय रमेश खंडारे, पोलीस पदाधिकारी तसेच कर्मचारी यांना मुलींनी राख्या बांधून शुभेच्छा दिल्या.पोलीस कर्मचारी वर्षभर नागरिकांच्या सुरक्षेसाठी कर्तव्य बजावत असतात. विविध सण-उत्सवांच्या काळातही स्वतःच्या कुटुंबापासून दूर राहून कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी पार पाडतात.
या उपक्रमात मोर्णा महिला महाविद्यालय, पातूर आणि ओयासिस सायन्स क्लासेस, पातूर यांनी मोठया संख्येने सहभाग घेतला.विद्यार्थिनी व सहभागी सदस्यांनी पोलीस बांधवांना राखी बांधून रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी पोलीस बांधवांनीही या उपक्रमाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.यावेळी अविनाश पोहरे, संचालक द प्रोफेशनल करिअर अकॅडमी, पातूर, सतीश हातोले संस्थापक ग्रामीण युवा बहुउद्देशीय संस्था, तुलंगा बु. यांच्या पुढाकारातून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.तसेच ओयासिस चे संचालक जयेंद्र बोरकर, पवन तांबे, ऍड.पंकज पोहरे,सचिन तायडे, निशांत हातोले,शुभम गवई आदी उपस्थित होते.







