3 सप्टेंबर 26 भूम
भूम :महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) सवलतधारक प्रवाशांसाठी ‘नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड’ (NCMC) अनिवार्य केले असले, तरी तांत्रिक त्रुटी आणि सर्व्हर डाऊनच्या समस्येमुळे ग्रामीण व शहरी भागातील प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत. तिकीट मशिनमध्ये कार्ड स्वीकारले जात नसल्याने किंवा एरर येत असल्याने महिला व ज्येष्ठ नागरिकांना हक्काच्या सवलतीपासून वंचित राहावे लागत असून, नाईलाजास्तव पूर्ण तिकीट काढून प्रवास करावा लागत आहे.
मशिन हँग आणि नेटवर्कच्या अडचणी
एसटी बसमधील इलेक्ट्रॉनिक तिकीट मशिन (ETIM) अनेक ठिकाणी NCMC कार्ड स्कॅन करताना प्रतिसाद देत नाहीत. ग्रामीण भागात इंटरनेट कनेक्टिव्हिटीचा अभाव, सर्व्हरवर येणारा अतिरिक्त ताण आणि मशिन हँग होण्याच्या त्रासामुळे वाहक हतबल झाले आहेत. कार्डवर टॅप करूनही तिकीट जनरेट न झाल्यामुळे नियमानुसार वाहकांना प्रवाशांना पूर्ण दराचे रोख तिकीट द्यावे लागत आहे.
प्रवासी आणि वाहकांमध्ये वादाचे प्रसंग
शासनाने महिलांसाठी ५०% सवलत आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत अथवा ५०% सवलतीची योजना लागू केली आहे. मात्र, तांत्रिक बिघाडामुळे प्रवाशांच्या खिशाला थेट कात्री लागत असल्याने प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. या तांत्रिक समस्येमुळे अनेक मार्गांवर वाहक आणि प्रवाशांमध्ये रोज बाचाबाची व वादाचे प्रसंग उद्भवत आहेत.
प्रवाशांच्या प्रमुख मागण्या:
तांत्रिक यंत्रणा आणि सर्व्हर पूर्णपणे सक्षम होईपर्यंत आधार कार्ड किंवा जुन्या ओळखपत्रावर मिळणारी सवलत पूर्ववत सुरू ठेवावी.
कार्ड रिचार्ज (Top-up) आणि नोंदणीसाठी ग्रामीण पातळीवर पुरेशी केंद्रे उपलब्ध करावीत.
प्रणाली सुरळीत होईपर्यंत प्रवाशांकडून पूर्ण तिकीट आकारणी त्वरित थांबवावी.
“यंत्रणा पूर्णपणे तयार नसताना घाईघाईने नियम लागू केल्यामुळे सामान्य प्रवाशांना नाहक आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. महामंडळाने प्रवाशांची अडचण समजून तात्काळ पर्यायी व्यवस्था करावी.



