अविनाश जाधव वार्ताहर
कळंबोली पनवेल प्रतिनिधी : नवीनच मार्च मध्ये चालू झालेले नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ वरती (एनएमआयए) जगातील सर्वात मोठ्या मालवाहू विमानांपैकी एक असलेल्या अँटोनोव्ह एएन-१२४ रुस्लान विमानाचे आगमन झाले. अबुधाबीहून सुमारे ४६ टन माल घेऊन हे बलाढ्य विमान नवी मुंबईत दाखल झाले.
अँटोनोव्ह एएन-१२४ रुस्लान हे सर्वात मोठ्या आकाराच्या तसेच अवजड मालाच्या वाहतुकीसाठी विशेष प्रसिद्ध असलेले मालवाहू विमान आहे. या विमानाच्या पुढील भागाचा दरवाजा उघडता येत असल्याने नेहमीच्या मालवाहू विमानांतून वाहतूक करणे अवघड असलेल्या मोठ्या आकाराच्या वस्तूही सहजपणे विमानात चढविता आणि उतरविता येतात.
ही विमानतळाच्या मालवाहतूक क्षमतेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण बाब मानली जात आहे. मोठ्या आकाराची आणि विशेष प्रकारची मालवाहू विमाने हाताळण्याची विमानतळाची क्षमता यामुळे अधोरेखित झाली आहे.
आधुनिक पायाभूत सुविधा आणि अत्याधुनिक मालवाहतूक व्यवस्थेमुळे एनएमआयए आगामी काळात देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय कार्गो वाहतुकीचे महत्त्वाचे केंद्र म्हणून विकसित होण्याच्या दिशेने आणखी एक पाऊल पुढे टाकत असल्याचे या आगमनातून स्पष्ट झाले आहे.




