शहादा,दि.०४
दरा व चिंचोरा परिसरातील विद्यार्थ्यांना म्हसावद, लोणखेडा व शहादा येथे शिक्षणासाठी ये-जा करण्यास सुलभ व्हावे, यासाठी पुरेशी व नियमित बस सुविधा तातडीने उपलब्ध करून देण्यात यावी, या मागणीचे निवेदन स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया व डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या वतीने शहादा आगार प्रमुखांसह प्रांताधिकारी कार्यालयात देण्यात आले.
दरा व चिंचोरा भागातील अनेक विद्यार्थी दररोज शिक्षणासाठी प्रवासावर अवलंबून असतात, परंतु नियमित बसफेऱ्या नसल्याने त्यांची मोठी गैरसोय होत आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हिताचा विचार करून या मार्गांवर तातडीने बसफेऱ्या वाढवण्याची मागणी शहादा आगार प्रमुखांना देण्यात आलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.याचबरोबर शहादा प्रांत कार्यालयावर “शाळा वाचवा!” मोहिमेअंतर्गत तसेच आदिवासी विद्यार्थी वसतिगृहांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर तातडीने कार्यवाही व्हावी, यासाठी जोरदार आंदोलन करण्यात आले.आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी दिलेल्या घोषणांमुळे परिसर दुमदुमून गेला. विद्यार्थ्यांना दर्जेदार व सुलभ शिक्षण मिळावे, शाळांचे प्रश्न सुटावेत आणि वसतिगृहांतील समस्या तात्काळ मार्गी लागाव्यात, अशी ठाम भूमिका संघटनांनी घेतली. प्रशासनाने या प्रश्नांकडे दुर्लक्ष न करता योग्य ती पावले उचलावीत, अन्यथा आगामी काळात अधिक तीव्र आंदोलन उभारले जाईल, असा इशाराही एसएफआय व डिवायएफआयच्या पदाधिकाऱ्यांनी याप्रसंगी दिला.









