राहुल घरतच्या पोलीस कोठडीत १३ सप्टेंबरपर्यंत वाढ; मनीष संखे, साईराज पाटील व राहुल संखे यांना अंतरिम अटकपूर्व जामीन नाकारला
पालघर जिल्हा प्रतिनिधी केविल पाटील
पालघर : दहीहंडी उत्सवादरम्यान जखमी झालेल्या गोविंदांना पालघर येथील रुग्णालयातून सोडण्यावरून झालेल्या कथित मारहाण व रुग्णालयातील धुडगूस प्रकरणात न्यायालयीन कारवाईला वेग आला आहे. या प्रकरणातील अटकेत असलेले राहुल घरत यांच्या पोलीस कोठडीत १३ सप्टेंबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे. दरम्यान, अन्य संशयित आरोपी मनीष उर्फ विकी संखे, साईराज पाटील आणि राहुल संखे यांनी दाखल केलेल्या अटकपूर्व जामीन अर्जावर अंतरिम अटकपूर्व जामीन देण्यास पालघर अतिरिक्त सत्र न्यायालयाने नकार दिला असून पुढील सुनावणी १५ सप्टेंबर रोजी होणार आहे.
शिवसेनेतर्फे पालघर शहरात आयोजित दहीहंडी उत्सवादरम्यान जखमी झालेल्या गोविंदांना रुग्णालयातून सोडण्याच्या मुद्द्यावरून हा वाद झाल्याचे पोलिसांच्या कारवाईतून समोर आले आहे. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना कथित मारहाण तसेच रुग्णालयात धुडगूस घातल्याप्रकरणी भारतीय न्याय संहिता आणि महाराष्ट्र वैद्यकीय सेवा व्यक्ती व वैद्यकीय सेवा संस्था अधिनियमातील संबंधित तरतुदींनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाची मुंबई उच्च न्यायालयानेही दखल घेतली असून, पोलिसांच्या तपासाच्या भूमिकेबाबत न्यायालयाने नापसंती व्यक्त केल्याचे समोर आले आहे. इंडियन मेडिकल असोसिएशनच्या याचिकेच्या अनुषंगाने उच्च न्यायालयात सुनावणी सुरू असून, ११ सप्टेंबर रोजी याबाबत पुढील आदेश अपेक्षित आहेत. त्यामुळे या प्रकरणातील पोलिसांच्या तपासाकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.
राहुल घरतच्या कोठडीत वाढ
संशयित आरोपी राहुल घरत हे ७ सप्टेंबर रोजी पालघर पोलीस ठाण्यात हजर झाले होते. त्यानंतर न्यायालयाने प्रथम एक दिवसाची, तर ८ सप्टेंबर रोजी दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. गुरुवारी झालेल्या सुनावणीदरम्यान पोलिसांनी पुढील तपासासाठी घरत यांच्या पोलीस कोठडीत आणखी पाच दिवसांची वाढ करण्याची मागणी केली.
आरोपीच्या वतीने बचाव पक्षाच्या वकिलांनी तपासात अपेक्षित गती नसल्याचा युक्तिवाद करत पोलीस कोठडी वाढवू नये, अशी मागणी केली. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने राहुल घरत यांच्या पोलीस कोठडीत १३ सप्टेंबरपर्यंत वाढ करण्याचे आदेश दिले.
तिघांचा अंतरिम अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला
दरम्यान, या प्रकरणातील अन्य संशयित आरोपी मनीष उर्फ विकी संखे, साईराज पाटील आणि राहुल संखे यांनी पालघर अतिरिक्त सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला. या अर्जावर सुनावणीदरम्यान संबंधित बाजूंचे म्हणणे ऐकून अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. एन. पाटील यांनी तिघांनाही अंतरिम अटकपूर्व जामीन देण्यास नकार दिला. या अर्जावरील पुढील सुनावणी १५ सप्टेंबर रोजी ठेवण्यात आली आहे.
नऊ संशयितांविरुद्ध वॉरंटची मागणी
या प्रकरणात एकूण नऊ संशयित आरोपींचा तपास सुरू असून, पोलिसांनी शोध घेऊनही काही आरोपी अद्याप हाती लागले नसल्याचे तपास अधिकारी तथा उपविभागीय पोलीस अधिकारी उमेश गवळी यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले आहे. फरार संशयितांविरुद्ध अटक वॉरंट मिळावे, यासाठी पोलिसांनी न्यायालयात अर्ज केला आहे. या अर्जावरही ११ सप्टेंबर रोजी निर्णय अपेक्षित असल्याने पुढील घडामोडींना महत्त्व प्राप्त झाले आहे.
उच्च न्यायालयातील सुनावणी, अटक वॉरंटची मागणी, राहुल घरत यांच्या पोलीस कोठडीत वाढ आणि तिघांचा अंतरिम अटकपूर्व जामीन नाकारला जाणे यामुळे पालघर रुग्णालयातील या प्रकरणाची न्यायालयीन लढाई आता निर्णायक टप्प्यावर पोहोचली आहे.





