कणकोरी प्रतिनिधी : कणकोरी गावातील अंगणवाडी मदतनीस पदाच्या गुणवत्ता यादीवरून वाद निर्माण झाला असून, प्रथम क्रमांकाच्या अर्जदाराच्या M.Com शैक्षणिक कागदपत्रावर आक्षेप घेण्यात आला आहे. संबंधित उमेदवाराने M.Com पदवी पूर्ण केलेली नसताना केवळ पहिल्या वर्षाचे प्रमाणपत्र जोडल्याचा आरोप असून, त्याआधारे देण्यात आलेल्या ४ अतिरिक्त गुणांची चौकशी करून संबंधित अर्जदारास अपात्र ठरवावे, अशी मागणी तक्रारदाराने केली आहे.
दरम्यान, या प्रकरणात फॉर्म भरणाऱ्या व्यक्तीने तक्रारदाराला फोन करून, “फॉर्म मागे घे, तुला गरज लागेल. मी ग्रामपंचायतीला उभा राहणार आहे. तुम्ही फॉर्म मागे घेतला नाही तरी काही फरक पडत नाही,” अशा आशयाचे बोलणे झाल्याचा दावा तक्रारदाराने केला आहे. तसेच “मला चांगले-चांगले घाबरतात,” असेही सांगण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे.
तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार, त्यानंतर संबंधित व्यक्तीच्या घरी या विषयावर चर्चा करण्यासाठी गेले असता, त्यांच्या घरच्यांनी संबंधित व्यक्तीची बाजू घेत आवाज उंचावून बोलल्याचे सांगण्यात आले.
विशेष म्हणजे, भरती प्रक्रियेतील आक्षेप कोणाकडून आले, त्यामध्ये काय नमूद करण्यात आले आहे आणि त्याची माहिती संबंधित व्यक्तींना नेमकी कोणाकडून मिळत आहे, याचीही चौकशी होणे आवश्यक असल्याचे तक्रारदाराने म्हटले आहे. भरती प्रक्रियेतील गोपनीय माहिती बाहेर कशी पोहोचली, याची वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून चौकशी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
तसेच संबंधित उमेदवाराच्या M.Com कागदपत्रांची अधिकृत पडताळणी, ४ अतिरिक्त गुण देण्याची प्रक्रिया आणि गुणवत्ता यादी तयार करताना संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांची भूमिका यांची निष्पक्ष चौकशी करावी. कागदपत्रे नियमानुसार अपात्र ठरल्यास संबंधित अर्जदारास बाद करून पात्र पुढील उमेदवारास नियमानुसार संधी द्यावी. गैरप्रकार आढळल्यास जबाबदार अधिकारी-कर्मचाऱ्यांवर नियमानुसार कारवाई करावी, अशी मागणी तक्रारदाराने केली आहे.
या संदर्भात तक्रारदाराने जिल्हा कार्यक्रम अधिकारी (महिला व बाल विकास), जिल्हा परिषद, छत्रपती संभाजीनगर तसेच बालविकास प्रकल्प अधिकारी, गंगापूर यांच्याकडे लेखी तक्रार करून संबंधित प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली आहे.






