कारंजा – विदर्भाची काशी
विदर्भाच्या पुण्यभूमीत वाशिम जिल्ह्यातील कारंजा (लाड) हे क्षेत्र केवळ श्री नृसिंह सरस्वती महाराजांचे जन्मस्थान म्हणूनच नव्हे, तर आदिशक्तीचे माहेरघर म्हणूनही प्रसिद्ध आहे. स्कंद पुराणात आणि श्रीकरंज माहात्म्य या प्राचीन संस्कृत पोथीत या क्षेत्राचा उल्लेख येतो. येथे वसिष्ठ ऋषींचे शिष्य करंज ऋषींनी तपस्या केली म्हणून या नगरीला कारंजा नाव मिळाले. या नगरीत आदिशक्तीने आपले कायमचे वास्तव्य केले, ते अनेक रूपांत – कामाक्षा, एकविरा, चंद्रावती, यक्षिणी, गौरी आणि पद्मावती. त्यापैकीच एक अत्यंत जागृत आणि नवसाला पावणारी देवता म्हणजे श्री कामाक्षा माता.
कामाक्षा या शब्दाचा अर्थ आहे – काम + अक्षा म्हणजे कामना पूर्ण करणारी देवी, किंवा जी प्रेमाच्या नेत्राने भक्ताकडे पाहते ती. आसाममधील नीलांचल पर्वतावरील जगप्रसिद्ध ५१ शक्तीपीठांपैकी सर्वश्रेष्ठ शक्तीपीठ म्हणजे कामाख्या कामपिठ . तेथे देवी सतीच्या योनिभागाचे पतन झाले होते. त्यामुळे ते ठिकाण सृजनशक्तीचे प्रतीक मानले जाते.
अशीच मान्यता आहे की कारंजा येथील कामाक्षा माता ही आसामच्या कामाख्या देवीचीच प्रतिरूप आहे. अनेक भाविकांचे म्हणणे आहे की प्राचीन काळी करंजऋषीच्या तपाने प्रसन्न होऊन येथील टेकाड्यांमध्ये जमिनीतून देवीची स्वयंंभू पाषाण प्रतिमा प्रकट झाली. ही प्रतिमा काळ्या पाषाणाची, अत्यंत तेजस्वी आणि कामाख्या देवीच्या मूळ रूपासारखीच आहे. म्हणूनच या देवीला कामाक्षा असे नाव पडले.
स्थानिक जेष्ठांच्या सांगण्यानुसार, सुमारे ७०० ते ८०० वर्षांपूर्वी कारंजा शहरात ऋषी तलावाच्या काठावर, खोलेश्वर महादेवाच्या उत्तर दिशेने मंगरूळ वेशीचे आत, नगर पालिका कार्यालयाजवळ,गोंधळीनगर येथे या श्री कामाक्षा देवीचे मोठे मंदिर होते. कारंजा शहराच्या चारही बाजूला तलाव आहेत, जे या नगरीला जलसंपन्नता देतात. बेंबळा नदी, जी यमुनेच्या थेंबापासून निर्माण झाली असे पुराणात सांगितले जाते, तिच्या काठावर हे शक्तीक्षेत्र वसले आहे.
असे सांगितले जाते की चंद्रदेवाला गुरुपत्नी तारासोबत केलेल्या पापामुळे शाप मिळाला होता. त्या शापमुक्तीसाठी चंद्राने कारंजा क्षेत्रात येऊन तपस्या केली आणि शंकराचे मंदिर आणि पाण्याचे कुंड म्हणजे बेंबळपाट बांधले. त्या तपस्येने प्रसन्न होऊन आदिशक्तीने त्याला दर्शन दिले, तीच ही कामाक्षा माता.
हिंदवी स्वराज्य संस्थापक राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज यांना श्री कामाक्षा मातेने दृष्टांत दिल्याने शिवछत्रपती शिवरायांनी सुद्धा कारंजा नगरीत येऊन मातेचे दर्शन घेतले आणि स्वराज्य निर्मितीच्या कार्यासाठी तन मन धनाने शिवरायांना आशिर्वाद दिले.
कारंजेकरांसाठी नवरात्र म्हणजे कामाक्षा मातेचा जागर. शारदीय नवरात्राच्या नऊही दिवस मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम होतात.
पहिल्या दिवशी घटस्थापना आणि दररोज पूजा, अर्चना, भजन, पूजन आणि संध्याकाळी महाआरती होते. देवीला नऊ दिवस घटात बसवले जाते .अष्टमीच्या दिवशी रात्री होमहवण, दिपप्रज्वलन आणि कन्या पूजन केले जाते. हजारो सुवासिनी देवीला ओटी भरतात. सद्यस्थितीत या मंदिराचा कारभार महाजन कुटूंबीयाकडे असून, दिगंबर पंत निळकंठ महाजन महाराज हे मंदिराची व्यवस्था पहातात. पुजारी म्हणून रोहित दिंगबरपंत महाजन आहेत. तर कडोळे या गोंधळ्यांकडे गोंधळ जागरण आरतीचा मान असून, मानकरी गोंधळी ज्ञानेश्वर विठ्ठलराव कडोळे हे असून, मातृशक्ती उपासक संजय मधुकरराव कडोळे यांनी देवी श्री कामाक्षा माहात्म्य, श्री कामाक्षा चालिसा, आरत्या लिहिल्या आहेत.
कारंजा हे जैन मंदिरांसाठीही प्रसिद्ध आहे. येथील चंद्रनाथ स्वामी दिगंबर जैन मंदिरात पद्मावती देवीचे मंदिर आहे. पण नवरात्रीत सर्व धर्माचे लोक कामाक्षा मातेच्या दर्शनाला एकत्र येतात, हे या क्षेत्राचे वैशिष्ट्य आहे.
असे मानले जाते की ज्या दाम्पत्याला संतती नाही, त्यांनी देवीला नवस केल्यास त्यांची इच्छा पूर्ण होते. व्यापारात अडचण असणारे, लग्न न जुळणारे तरुण-तरुणी येथे आवर्जून येतात. देवीला नारळ, चुनरी आणि कुंकुमार्चन अर्पण करण्याची परंपरा आहे.
आज कारंजा लाड शहर झपाट्याने वाढत आहे, पण या आधुनिकतेच्या धावपळीतही कामाक्षा मातेचे मंदिर प्रत्येक कारंजेकराच्या हृदयात आहे. ती केवळ मूर्ती नाही, तर ती आमची आई आहे, जी आपल्या लेकरांचे रक्षण करते.
या नवरात्रात आपण सर्वांनी मिळून या आदिशक्तीला प्रार्थना करूया – हे कामाक्षा माते, आमच्या मनातील कामना पूर्ण कर, आमच्या कारंजा नगरीवर आणि संपूर्ण महाराष्ट्रावर तुझी कृपादृष्टी राहू दे.
।। जय कामाक्षा माता ।।
लेखक : संजय मधुकरराव कडोळे
महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त,दिव्यांग जनसेवक, ज्येष्ठ साहित्यीक, लोककलावंत,पत्रकार गोंधळीनगर,
मु.पो. कारंजा (लाड), ता. कारंजा, जि. वाशिम – ४४४१०५
मो. ९०७५६३५३३८






