काही कलाकार पडद्यावरून निघून जातात, पण प्रेक्षकांच्या मनातून कधीच जात नाहीत. नाना पाटेकर हे त्यापैकीच एक नाव!
काल महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग व महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ आयोजित ‘आठवणींतले नाना’ या आदरांजली सभेला उपस्थित राहण्याचा योग आला.
सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार साहेब, ज्येष्ठ अभिनेते शिवाजी साटम, रोहिणी हट्टंगडी, वर्षा उसगावकर, पुरुषोत्तम बेर्डे, जयवंत वाडकर, दिग्दर्शक मेहुल कुमार, संजय जाधव, अनंत महादेवन, आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे, मेघराज भोसले तसेच स्वाती म्हसे पाटील यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवरांची उपस्थिती होती.
प्रत्येकाच्या आठवणीतला नाना वेगळा होता… कुणासाठी स्पष्टवक्ता मित्र, कुणासाठी कसदार अभिनेता, तर कुणासाठी समाजाच्या वेदना समजून घेणारा संवेदनशील माणूस!
आशिष शेलारसाहेब यांनी नानांच्या स्पष्टवक्तेपणाच्या आठवणी सांगितल्या. तुकाराम मुंढे यांनी नानांसोबतच्या अखेरच्या संवादाची आठवण सांगताना व्यक्त केलेल्या भावना विशेष हृदयस्पर्शी होत्या.
दादासाहेब फाळके रसास्वाद मंडळाच्या उपक्रमांतर्गत नानांच्या ‘प्रहार’ चित्रपटाचे विशेष प्रदर्शनही आयोजित करण्यात आले होते.
एक चित्रपट प्रेक्षक म्हणून नानांचा अभिनय अनेकदा पाहिला, अनुभवला … पण काल त्यांच्या सहकाऱ्यांच्या आठवणींतून पडद्यामागचा नाना नव्याने समजला.
‘परिंदा’, ‘क्रांतिवीर’, ‘तिरंगा’, ‘अग्निसाक्षी’, ‘अब तक छप्पन’ ते ‘नटसम्राट’… किती भूमिका, किती चेहरे! पण त्या प्रत्येक चेहऱ्यामागे एकच गोष्ट कायम होती… अभिनयाशी असलेली प्रामाणिक निष्ठा!
काल सभागृहात नाना नव्हते… पण प्रत्येकाच्या शब्दांत, आठवणीत आणि डोळ्यांत नानाच होते!
कलाकार म्हणून नाना महान होतेच; पण माणूस म्हणून त्यांनी कमावलेली माणसं हीच त्यांच्या आयुष्याची खरी कमाई होती, याची जाणीव या सभेने करून दिली.
नाना… तुम्ही पडद्यावरून एक्झिट घेतली असेल, पण रसिकांच्या मनातला तुमचा चित्रपट कधीच संपणार नाही!
भावपूर्ण आदरांजली!
कुणाल साळुंके,
चित्रपट विश्लेषक/ समीक्षक









