-प्राचार्य डॉ. एम. एस. उभाळे
दोंडाईचा (प्रतिनिधी):- “भारताचे माजी राष्ट्रपती आणि महान शास्त्रज्ञ डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची जयंती दरवर्षी 15 ऑक्टोबर या दिवशी वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरी केली जाते. विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण करणे,डॉ. कलाम यांचे विचार पुढील पिढीपर्यंत पोहोचवणे तसेच वाचनामुळे विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्त्व विकास घडविणे, या उद्दिष्टांच्या पूर्तीसाठी वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात येतो. डॉ.कलाम यांचे आत्मचरित्र अग्निपंख प्रत्येकाने वाचले पाहिजे. त्यांच्या संपूर्ण जीवनाचा प्रेरणादायी प्रवास त्यांनी लिहिला आहे.तसेच आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात वाचनाकडे वाचकांचे दुर्लक्ष झालेले आहे.
त्यामुळे आजच्या संगणकाच्या युगात वाचनाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे” असे विचार प्राचार्य डॉ. एम. एस. उभाळे यांनी मांडले. ते श्रीमंत राजे दौलतसिंहजी रावल बी. एड. महाविद्यालयात आयोजित वाचन प्रेरणा दिन निमित्ताने कार्यक्रमात बोलत होते.
सर्वप्रथम प्रा. निशा ठाकूर यांनी प्रास्ताविकातून डॉ. कलाम यांच्या जीवनाविषयी माहिती सांगितली तसेच कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केला. प्राचार्य डॉ. एम. एस. उभाळे व इतर सर्व प्राध्यापकांच्या उपस्थितीत डॉ.कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन व अभिवादन करण्यात आले. त्यानंतर प्राचार्य डॉ. एम. एस. उभाळे यांनी अध्यक्षीय मनोगतातून वाचनाचे महत्त्व स्पष्ट केले. डॉ. योगिता चौधरी यांनी आभार अभिव्यक्ती केली. कार्यक्रमानंतर विद्यार्थ्यांनी ग्रंथालयातील विविध पुस्तकांची ओळख करून घेतली व एक तास ग्रंथालयात ग्रंथ वाचन केले.
कार्यक्रमाच्या नियोजनाचे मार्गदर्शन प्रा.डॉ.पी.डी.बोरसे व प्रा.एस.एम.ठाकरे यांनी केले. कार्यक्रमाचे व्यवस्थापन प्रा. निशा ठाकूर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा.आर.पी.पाटील, प्रा.अमृता चव्हाण,प्रा.रेवती बागुल व प्रा. खाचणे यांनी प्रयत्न केले. तर कृष्णा बागुल, शंकर गिरासे, अमर राजपूत व जयेश धनगर यांनी सहकार्य केले.कार्यक्रमासाठी द्वितीय वर्षातील सर्व विद्यार्थी उपस्थित होते.











