श्री गुरुदत्त मंदिर देवराई, करमाळा येथे नवव्या दिवशी पिंपळ वृक्षाचे रोपण; छत्रपती संभाजी महाराज बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद
करमाळा : शारदीय नवरात्रोत्सव २०२६ चे औचित्य साधून छत्रपती संभाजी महाराज बहुउद्देशीय सामाजिक संस्था, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने राबविण्यात आलेल्या ‘एक दिवस, एक माळ, एक वृक्ष’ या पर्यावरणपूरक संकल्पाची नऊव्या दिवशी यशस्वी पूर्तता करण्यात आली. नऊ दिवस, नऊ माळा आणि नऊ वृक्ष या संकल्पनेअंतर्गत अखेरच्या दिवशी पिंपळ वृक्षाचे रोपण करून या उपक्रमाची सांगता करण्यात आली.
श्री कमलादेवीच्या माळेच्या निमित्ताने श्री गुरुदत्त मंदिर देवराई, करमाळा येथे हा उपक्रम राबविण्यात आला. देवराई ग्रुपच्या सर्व सदस्यांनी या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. नवरात्रोत्सवातील धार्मिक श्रद्धेला पर्यावरण संवर्धनाची जोड देत वृक्षारोपणाचा संदेश समाजापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न या माध्यमातून करण्यात आला.
देवराई ग्रुपचे मोलाचे सहकार्य
या उपक्रमाला भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल देवराई ग्रुपच्या सर्व सदस्यांचे संस्थेच्या वतीने मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले. देवराईचे प्रमुख बाळासाहेब आबा देशमुख, वकील साहेब आणि इतर सदस्यांनी दिलेले सहकार्य, प्रेम व पाठिंबा कायम स्मरणात राहील, अशी भावना संस्थेचे सचिव आबासाहेब गावडे पाटील यांनी व्यक्त केली.
वृक्ष लावण्यासोबत जगविण्याचाही संकल्प
वृक्षारोपण करणे सोपे असले, तरी लावलेले झाड जगविणे हे अधिक महत्त्वाचे आहे. ही बाब लक्षात घेऊन देवराईचे प्रमुख बाळासाहेब आबा देशमुख यांनी प्रतिकूल परिस्थितीतही झाडांना पाणी उपलब्ध करून देण्याची व्यवस्था केली. लावलेले प्रत्येक झाड जगले पाहिजे आणि त्याची योग्य निगा राखली गेली पाहिजे, या विचारातून देवराई ग्रुपच्या सदस्यांनी या उपक्रमात सक्रिय सहभाग घेतला.
‘झाडे आहेत म्हणून आपण आहोत’ हे संस्थेचे ब्रीदवाक्य असून, पर्यावरणाचे रक्षण आणि वृक्षसंवर्धनाची जबाबदारी प्रत्येकाने स्वीकारावी, हा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
पर्यावरण संवर्धनाचा प्रेरणादायी संदेश
धार्मिक उत्सवाच्या माध्यमातून वृक्षारोपण आणि वृक्षसंवर्धनाची जाणीव निर्माण करणारा हा उपक्रम पर्यावरणप्रेमींसाठी प्रेरणादायी ठरला. केवळ झाडे लावणे नव्हे, तर त्यांचे संगोपन करून ती मोठी करणे हीच खरी पर्यावरणसेवा असल्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
— आबासाहेब गावडे पाटील, धाराशिवकर
सचिव, छत्रपती संभाजी महाराज बहुउद्देशीय सामाजिक संस्था, महाराष्ट्र राज्य









