टाईनी हार्ट्स प्रीस्कूलमध्ये भोंडला, दांडिया उत्साहात साजरा; ‘नवदुर्गा उद्योजिकतेची शक्ती’ उपक्रमातून यशस्वी उद्योजिकांचा सन्मान
लोणी काळभोर : टाईनी हार्ट्स प्रीस्कूल अँड अॅक्टिव्हिटी हब, सिद्राम मळा, लोणी काळभोर येथे भोंडला आणि दांडिया उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेचे जतन आणि संवर्धन करण्याच्या उद्देशाने पारंपरिक भोंडल्याचे आयोजन करण्यात आले होते. याच कार्यक्रमाच्या निमित्ताने महिलांच्या कर्तृत्वाला व्यासपीठ मिळवून देणाऱ्या ‘नवदुर्गा उद्योजिकतेची शक्ती’ या विशेष उपक्रमाचेही आयोजन करण्यात आले.
या उपक्रमांतर्गत लोणी काळभोर परिसरातील यशस्वी महिला उद्योजिकांचा खण-नारळ देऊन सन्मान करण्यात आला. महिलांच्या उद्योजकतेला प्रोत्साहन देणे, त्यांच्या कार्याची ओळख समाजापर्यंत पोहोचवणे आणि इतर महिलांना स्वावलंबनाची प्रेरणा देणे हा या उपक्रमामागील मुख्य हेतू होता.
कार्यक्रमाला सौ. सारिका नागेश काळभोर, अर्चना येलमार (पालक व विद्यार्थी समुपदेशक), संस्थेच्या उपाध्यक्षा सौ. मिलिंदा पवार, जयश्री लोहार आणि हेमा ढम यांची उपस्थिती होती. शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. तृप्ती पिसाळ यांनी कार्यक्रमाचे निवेदन केले. संस्थेच्या संचालिका सौ. प्रियांका ढम यांनी कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट करताना महिलांच्या आत्मविश्वासाला, जिद्दीला आणि उद्योजकीय वाटचालीला प्रोत्साहन देण्याचे महत्त्व अधोरेखित केले.
यावेळी अनुराधा डोके यांनी मुलांना मार्गदर्शन केले. पारंपरिक भोंडला, दांडिया आणि गरब्याच्या माध्यमातून उपस्थित महिलांनी आनंदोत्सवात सहभाग घेतला. सांस्कृतिक परंपरा, महिला सक्षमीकरण आणि सामाजिक बांधिलकी यांचा सुंदर संगम या कार्यक्रमातून अनुभवायला मिळाला.
‘संस्कार, शील आणि गुणवत्ता’ या मूल्यांना प्राधान्य देणाऱ्या टाईनी हार्ट्स प्रीस्कूल अँड अॅक्टिव्हिटी हबच्या या उपक्रमामुळे महिलांच्या कर्तृत्वाचा गौरव करण्याबरोबरच नव्या पिढीला संस्कृतीची ओळख आणि समाजातील प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वांकडून शिकण्याची संधी मिळाली.










