भजन, प्रार्थना आणि गरब्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी जपला भारतीय संस्कृतीचा वारसा
सावर्डे (प्रतिनिधी) : सह्याद्री शिक्षण संस्था संचलित गोविंदराव निकम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, सावर्डे येथे सरस्वती पूजन व घटस्थापनेचा कार्यक्रम भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. भारतीय संस्कृतीतील ज्ञान, विद्या, कला आणि संगीताचे महत्त्व अधोरेखित करणाऱ्या या कार्यक्रमात शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.
कार्यक्रमाची सुरुवात विद्यालयाचे पर्यवेक्षक महेश कुलकर्णी यांच्या हस्ते सरस्वती पूजनाने झाली. यावेळी विद्यार्थ्यांनी सामूहिक सरस्वती प्रार्थना सादर करून विद्येच्या देवतेप्रती श्रद्धा व्यक्त केली. सरस्वती पूजनाच्या माध्यमातून ज्ञानाची उपासना, अभ्यासातील सातत्य आणि संस्कारांचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यात आले.
कुमारी दुर्वा परकर हिने घटस्थापनेविषयी माहिती देताना या धार्मिक परंपरेचे सांस्कृतिक महत्त्व विशद केले. सरस्वती ही विद्या, कला, संगीत आणि बुद्धीची देवता मानली जाते. तिच्या पूजनातून ज्ञानार्जनाची प्रेरणा मिळते, हा विचार या उपक्रमातून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यात आला.
कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी भक्तिगीते आणि भजन सादर करून वातावरण भक्तिमय केले. पारंपरिक गरबा नृत्याच्या सादरीकरणाने कार्यक्रमात उत्साहाची भर पडली. धार्मिक परंपरांची ओळख करून देतानाच विद्यार्थ्यांमध्ये भारतीय संस्कृतीविषयी आदर, सामूहिक सहभागाची भावना आणि कलागुणांना प्रोत्साहन देण्याचा उद्देश या उपक्रमातून साध्य झाला.
सकाळच्या सत्रातील कार्यक्रमाचे नियोजन सौ. जे. पी. निकम यांनी, तर दुपारच्या सत्रातील कार्यक्रमाचे नियोजन सौ. अनुजा बागवे यांनी केले. त्यांनी विद्यार्थ्यांना सरस्वती पूजन आणि घटस्थापनेचे महत्त्व समजावून सांगितले. दुपारच्या सत्रातही विद्यार्थ्यांनी सामूहिक सरस्वती प्रार्थना सादर केली. दोन्ही सत्रांमध्ये शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
यावेळी विद्यालयाचे प्राचार्य राजेंद्र वारे आणि उपप्राचार्य विजय चव्हाण उपस्थित होते. प्राचार्य राजेंद्र वारे यांनी आपल्या मनोगतात सरस्वती पूजन हा भारतीय संस्कृतीतील महत्त्वाचा उत्सव असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांनी अभ्यासात सातत्य राखावे, ज्ञान मिळविण्याची जिज्ञासा जोपासावी आणि मेहनतीच्या बळावर आपले भविष्य उज्ज्वल करावे, असे आवाहन त्यांनी केले.
धार्मिक श्रद्धा, सांस्कृतिक परंपरा आणि शैक्षणिक मूल्ये यांचा सुंदर संगम घडविणारा हा कार्यक्रम शिक्षक व विद्यार्थ्यांच्या एकत्रित सहभागामुळे यशस्वी ठरला. सरस्वती पूजनाच्या वेळी संस्थेचे सचिव महेश महाडिक यांचीही उपस्थिती असल्याचे आयोजकांनी नमूद केले.










