सर्वधर्मीय नागरिकांचा सहभाग; भगवान बुद्धांच्या शांती, समता, बंधुता आणि मानवतेच्या विचारांचा जागर
मलका गुडा, ता. माहूर, जि. नांदेड | प्रतिनिधी
भगवान गौतम बुद्ध यांचे शांती, समता, बंधुता आणि मानवतेचे विचार समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने माहूर तालुक्यातील मलका गुडा येथे २१ ऑक्टोबर रोजी धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात सर्व जाती-धर्मांतील नागरिकांनी सहभागी होत सामाजिक एकोपा आणि धार्मिक सलोख्याचा संदेश दिला.
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १४ ऑक्टोबर १९५६ रोजी नागपूर येथील ऐतिहासिक दीक्षाभूमीवर बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. या ऐतिहासिक घटनेच्या स्मरणार्थ धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा केला जातो. भगवान बुद्धांचे मानवतावादी विचार आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे समताधिष्ठित समाजनिर्मितीचे स्वप्न साकार करण्यासाठी अशा कार्यक्रमांचे विशेष महत्त्व आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारतीय बौद्ध महासभेचे माहूर तालुकाध्यक्ष अॅड. छंदक वाटोरे होते. प्रमुख पाहुणे म्हणून सीताराम मंडळे सर, तुळशी, आनंद राव बोडलवार, दीपक कनालवार, किशोर आत्राम, दत्ता पोरनवार, किशोर चिंतावार, अमित पडलवार, गजानन चिंतावार, पत्रकार संतोष निळकंठवार, पत्रकार राजकुमार पडलवार, पत्रकार भीमराव मडावी, यादव आत्राम, श्रीरंगी बितवार, सतीश गौकणवार, श्रीराम दीपक बर्डे, पोलीस पाटील अनिता बोडलवार आणि सामाजिक कार्यकर्त्या पूजाताई नितीन कनालवार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते भगवान गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना अभिवादन करण्यात आले. उपासिका पूजाताई कनालवार यांच्या हस्ते पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर सामूहिक त्रिशरण व पंचशील ग्रहण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.
भगवान बुद्धांनी दिलेला करुणा, मैत्री, अहिंसा आणि प्रज्ञेचा संदेश आजच्या समाजासाठीही महत्त्वाचा आहे. जातिभेद आणि विषमता दूर करून शिक्षण, वैज्ञानिक दृष्टिकोन, बंधुता आणि सामाजिक समता ही मूल्ये जोपासणे काळाची गरज असल्याचे विचार यावेळी व्यक्त करण्यात आले. सर्वधर्मीय नागरिकांनी एकत्र येऊन धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा केल्याने परिसरात सामाजिक सलोखा आणि एकतेचे वातावरण निर्माण झाले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष अॅड. छंदक वाटोरे यांनी थोर महापुरुषांचे विचार आत्मसात करून समताधिष्ठित समाजनिर्मितीसाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्रीराम प्रसाद बर्डे, हर्ष बर्डे, किसन बर्डे, करण बर्डे, उपासिका आशाताई बर्डे, आम्रपालीताई बर्डे, अंकिता बर्डे, विनोद बर्डे आणि दीपक बर्डे यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजकुमार पडलवार यांनी केले, तर राहुल बर्डे यांनी आभार मानले.








