महसूल, पाणीपुरवठा, रस्ते, वीज आणि जमीनविषयक तक्रारींवर थेट संवाद; जिल्हास्तरावरच समस्या सोडविण्याचे अधिकाऱ्यांना आदेश
पालघर, दि. २३ ऑक्टोबर : नागरिकांच्या समस्या थेट ऐकून त्यांचे तातडीने निराकरण करण्याच्या उद्देशाने पालघर जिल्हाधिकारी कार्यालयातील लोकशाहीर आत्माराम पाटील जिल्हा नियोजन समिती सभागृहात जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले. राज्याचे वनमंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी या जनता दरबारात नागरिकांशी थेट संवाद साधत विविध विभागांच्या तक्रारींवर तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. या जनता दरबारात एकूण १,०५८ अर्ज प्राप्त झाले.
जनता दरबाराला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. जिल्ह्यातील विविध भागांतून आलेल्या नागरिकांनी महसूल, पाणीपुरवठा, रस्ते, वीज, आरोग्य, शिक्षण, जमीनविषयक तक्रारी तसेच विविध शासकीय योजनांशी संबंधित प्रश्न पालकमंत्र्यांसमोर मांडले.
पालकमंत्री गणेश नाईक यांनी प्रत्येक अर्जदाराचे म्हणणे ऐकून घेत संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना आवश्यक ती कार्यवाही तातडीने करण्याच्या सूचना दिल्या. नागरिकांच्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी विविध विभागांनी परस्पर समन्वय साधून प्रकरणे जलदगतीने मार्गी लावावीत, असेही त्यांनी स्पष्ट केले.
“सामान्य नागरिकांना आपल्या समस्या घेऊन मंत्रालयाचे दरवाजे ठोठावण्याची वेळ येऊ नये. त्यांच्या समस्या जिल्हास्तरावरच मार्गी लागल्या पाहिजेत,” असे सांगत पालकमंत्री नाईक यांनी अधिकारी वर्गाला जनतेच्या प्रश्नांबाबत संवेदनशील राहण्याचे निर्देश दिले. नागरिकांच्या अडचणी सोडविणे ही प्रत्येक अधिकाऱ्याची जबाबदारी असून, प्रत्येक प्रकरण गांभीर्याने हाताळले जावे, असेही त्यांनी नमूद केले.
जनता दरबारात काही प्रकरणांमध्ये तत्काळ निर्णय घेण्यात आल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केल्याची माहिती देण्यात आली. उर्वरित अर्जांवरही संबंधित विभागांनी त्वरित कार्यवाही करून नागरिकांना दिलासा द्यावा, यावर पालकमंत्र्यांनी भर दिला.
यावेळी आमदार राजेंद्र गावित, आमदार हरिश्चंद्र भोये, जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे, जिल्हा पोलीस अधीक्षक यतीश देशमुख, अपर पोलीस अधीक्षक विनायक नरळे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रकाश निकम, निवासी उपजिल्हाधिकारी सुभाष भागडे, उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) रणजित देसाई यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख, वरिष्ठ अधिकारी आणि नागरिक उपस्थित होते.









