सर्पमित्र नितीन घायतडक यांचा पुढाकार; पंचरत्न मंडळाच्या युवकांचे सहकार्य, वनविभागाकडून बिबट्या सुरक्षित ताब्यात
श्रीगोंदा : प्रतिनिधी
श्रीगोंदा तालुक्यातील शेडगाव येथील कासारमळा परिसरात बिबट्याचा वावर आढळल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, सर्पमित्र नितीन घायतडक यांच्या पुढाकाराने, माजी सरपंच विजय शेंडे, पोलीस पाटील कारभारी बेलेकर आणि पंचरत्न मंडळाच्या युवकांच्या सहकार्याने बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावण्यात आला. या पिंजऱ्यात बिबट्या अडकल्यानंतर ग्रामस्थांनी सुटकेचा निःश्वास सोडला.
कासारमळा परिसरात बिबट्या दिसत असल्याची माहिती सर्पमित्र नितीन घायतडक यांना मिळाली. त्यांनी तत्काळ माजी सरपंच विजय शेंडे आणि पोलीस पाटील कारभारी बेलेकर यांना याबाबत कळविले. त्यानंतर विजय शेंडे यांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती दिली. वनविभागाच्या पथकाने घटनास्थळी पाहणी करून परिस्थितीचा आढावा घेतला.
बिबट्याला पकडण्यासाठी पिंजऱ्याची आवश्यकता असल्याने नितीन घायतडक यांनी पुढाकार घेतला. २१ ऑक्टोबर २०२६ रोजी त्यांनी स्वतःच्या खर्चाने वाहन भाड्याने करून श्रीगोंदा येथील वनविभागाच्या कार्यालयातून पिंजरा आणला. या कामात पंचरत्न मंडळाच्या युवकांनीही सहकार्य केले.
पिंजऱ्यात आमिष म्हणून शेळी किंवा बोकड ठेवण्याची गरज होती. मात्र, ते उपलब्ध न झाल्याने युवकांसमोर अडचण निर्माण झाली. त्यावर पर्याय म्हणून युवकांनी तीन कोंबड्या विकत घेऊन पिंजऱ्यात ठेवल्या. त्यानंतर लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्या अडकला.
बिबट्या पिंजऱ्यात अडकल्याची माहिती मिळताच विजय शेंडे यांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना कळविले. त्यानंतर वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. बिबट्याला सुरक्षितपणे हलविण्यासाठी विजय शेंडे यांनी वाहनाची व्यवस्था केली. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी बिबट्याला सुरक्षितपणे ताब्यात घेतले.
युवकांच्या तत्परतेचे ग्रामस्थांकडून कौतुक
कासारमळा परिसरात बिबट्याचा वावर असल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण होते. अशा वेळी नितीन घायतडक यांनी स्वतःच्या खर्चाने पिंजरा आणण्यासाठी घेतलेला पुढाकार, पंचरत्न मंडळाच्या युवकांनी केलेले सहकार्य आणि विजय शेंडे यांनी केलेली मदत यांचे ग्रामस्थांकडून कौतुक होत आहे.
दरम्यान, परिसरात बिबट्या किंवा अन्य वन्यप्राण्यांचा वावर आढळल्यास नागरिकांनी स्वतःहून जवळ जाण्याचा किंवा पकडण्याचा प्रयत्न करू नये. सुरक्षित अंतर राखून तातडीने वनविभागाला माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे.









