वार्षिक बैठकीत नूतन कार्यकारिणी जाहीर; पत्रकार संघाची एकजूट कायम ठेवण्याचे ज्येष्ठ पत्रकार चंद्रकांत शिवदे यांचे आवाहन
शहादा, दि. २५ | प्रतिनिधी
शहादा तालुका पत्रकार संघाची वार्षिक बैठक येथील शासकीय विश्रामगृहाच्या सभागृहात ज्येष्ठ पत्रकार चंद्रकांत शिवदे यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात पार पडली. या बैठकीत संघाच्या विविध उपक्रमांचा आढावा घेण्यात आला तसेच आगामी काळातील नियोजनावर चर्चा करून नूतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. संघाच्या अध्यक्षपदी प्रा. नेत्रदीपक कुवर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
बैठकीत वर्षभरात राबविण्यात आलेल्या विविध कार्यक्रमांची माहिती उपस्थितांना देण्यात आली. तसेच आगामी काळात आयोजित करण्यात येणाऱ्या उपक्रमांबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी संघाचे ज्येष्ठ पत्रकार प्रा. डी. सी. पाटील हे दुर्धर आजारातून पूर्णपणे बरे झाल्याबद्दल उपस्थितांनी त्यांचे अभिनंदन करून त्यांना उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
नूतन कार्यकारिणी पुढीलप्रमाणे :
- अध्यक्ष : प्रा. नेत्रदीपक कुवर
- उपाध्यक्ष : हर्षल साळुंखे
- सचिव : योगेश सावंत
- सहसचिव : दीपक वाघ
- खजिनदार : प्रा. ए. ए. खान
- संचालक : सुनील सोमवंशी, प्रा. रवींद्र पंड्या
- मार्गदर्शक : चंद्रकांत शिवदे, प्रा. डी. सी. पाटील
- सल्लागार : राजेंद्र अग्रवाल, प्रा. दत्ता वाघ
- कायदेशीर सल्लागार : अॅड. राजेश कुलकर्णी
अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर प्रा. नेत्रदीपक कुवर यांनी आपल्या मनोगतात संघाच्या सर्व सदस्यांच्या सहकार्याने आणि मार्गदर्शनाने संघाची वाटचाल अधिक गतिमान करण्याचा प्रयत्न राहील, असे सांगितले. नवनवीन उपक्रम आणि योजनांना मूर्त स्वरूप देण्यासाठी सर्व सदस्यांचे सक्रिय सहकार्य आवश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले.
अध्यक्षीय भाषणात ज्येष्ठ पत्रकार चंद्रकांत शिवदे यांनी शहादा तालुका पत्रकार संघाची स्वतंत्र ओळख आणि वेगळी छाप असल्याचे सांगितले. ही ओळख कायम राखण्यासाठी सर्व सदस्यांनी एकजुटीने आणि समन्वयाने कार्यरत राहावे, असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगेश सावंत यांनी केले, तर आभार प्रदर्शन हर्षल साळुंखे यांनी मानले. वार्षिक बैठकीच्या माध्यमातून संघाच्या पुढील वाटचालीसाठी नवी कार्यकारिणी सज्ज झाली आहे.










