जिल्ह्यातील १६ तालुके दुष्काळग्रस्त घोषित; तलाव व धरणांमध्ये ७० टक्के पाणीसाठा उपलब्ध, चारा लागवडीवरही भर
यवतमाळ : प्रतिनिधी
यवतमाळ जिल्ह्यात यंदा १६ तालुके दुष्काळग्रस्त घोषित करण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर उपलब्ध पाणीसाठ्याचे योग्य नियोजन करून पाण्याचा अपव्यय टाळावा, असे आवाहन जिल्हाधिकारी विकास मीना यांनी शेतकरी बांधवांना केले आहे.
जिल्ह्यातील तलाव व धरणांमध्ये सध्या सुमारे ७० टक्के पाणीसाठा उपलब्ध असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. शेतकऱ्यांकडून सिंचनासाठी पाण्याची मागणी होत असल्याने काही तलावांमधून पाणी सोडण्याचे नियोजन करण्यात येणार आहे. मात्र, धरणे व तलावांतील पाण्याची पातळी लक्षात घेता शेतकऱ्यांनी पाण्याचा वापर जपून करणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
ज्या शेतकऱ्यांच्या सोयाबीन पिकाची कापणी पूर्ण झाली आहे, त्यांनी शेतात चारा पिकांची लागवड करण्याचा विचार करावा. त्यामुळे आगामी काळात जनावरांसाठी चाऱ्याची कमतरता भासणार नाही. तसेच पाण्याचा अनावश्यक वापर टाळून उपलब्ध पाणीसाठ्याचे नियोजनबद्ध व्यवस्थापन करावे, असे आवाहनही जिल्हाधिकारी मीना यांनी केले.
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना विविध सवलती
महाराष्ट्र शासनाने दुष्काळग्रस्त भागातील नागरिक व शेतकऱ्यांसाठी विविध सवलती आणि मदतीसंदर्भात आदेश जारी केले आहेत. यामध्ये जमीन महसुलात सूट, परीक्षा शुल्कात सवलत आणि पीककर्ज पुनर्गठन यांसारख्या उपाययोजनांचा समावेश आहे.
एखाद्या शेतकऱ्याला बँकेकडून कर्ज उपलब्ध होत नसल्यास त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय, यवतमाळ येथे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. या प्रक्रियेत जिल्हा परिषदेकडूनही सहकार्य केले जाणार असल्याचे जिल्हाधिकारी विकास मीना यांनी सांगितले.
दुष्काळाच्या परिस्थितीत पाणी, चारा आणि आर्थिक मदतीचे योग्य नियोजन करणे आवश्यक असून, नागरिक व शेतकऱ्यांना महाराष्ट्र शासनाकडून पूर्ण सहकार्य केले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.








