वाशिममधील धम्म मेळाव्यात दुष्काळी परिस्थितीवरून सरकारवर टीका; जिल्ह्यातील नागरिकांची मोठी उपस्थिती
वाशिम / प्रतिनिधी :
राज्यात दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला असून, प्रत्यक्ष मदतीची प्रतीक्षा अद्याप कायम आहे. शासनाकडून मदतीच्या घोषणा केल्या जात असल्या, तरी ही मदत शेतकऱ्यांच्या हातात नेमकी कधी पडणार, असा सवाल वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थित केला.
वाशिम येथील उलेमाले लेआऊट परिसरात २६ ऑक्टोबर रोजी धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त आयोजित धम्म मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी त्यांनी राज्यातील दुष्काळी परिस्थिती आणि शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणींचा मुद्दा उपस्थित करत शासनाच्या मदत प्रक्रियेवर टीका केली.
धम्म मेळाव्याला मान्यवरांची उपस्थिती
या मेळाव्यात प्रा. अंजलीताई आंबेडकर, वंचित बहुजन आघाडीचे प्रदेशाध्यक्ष राजेंद्र पातोडे, सुजातदादा आंबेडकर आणि माजी आमदार नातिकोद्दीन खतीब यांनीही उपस्थितांना संबोधित केले.
भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष सिद्धार्थ भगत हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. तसेच वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष पश्चिम दत्तराव धांडे आणि पश्चिम अध्यक्ष विलास खिल्लारे यांची उपस्थिती होती.
नागरिकांची मोठी गर्दी
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शालिग्राम पठाडे यांनी केले. मुकुंद वानखेडे यांनी सूत्रसंचालन केले, तर हर्षल इंगोले यांनी आभार प्रदर्शन केले.
धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त आयोजित या मेळाव्याला वाशिम जिल्ह्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. शेतकऱ्यांच्या प्रश्नांसह विविध सामाजिक आणि सार्वजनिक विषयांवर झालेल्या भाषणांकडे उपस्थितांचे लक्ष वेधले गेले.











