पशुधनाचे आरोग्य, सकस चारा आणि दुग्धव्यवसायातील खर्च बचतीबाबत पशुपालकांना मार्गदर्शन
चोपडा, जि. जळगाव (वार्ताहर) : चोपडा तालुक्यातील काझीपुरा येथे पशुवैद्यकीय चिकित्सालय हातेड यांच्या वतीने बुधवार, दि. २८ ऑक्टोबर २०२६ रोजी पशुरोग निदान, उपचार व वंध्यत्व निवारण शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात परिसरातील अनेक पशुपालकांनी आपल्या जनावरांची तपासणी करून उपचारांचा लाभ घेतला.
कार्यक्रमांतर्गत चारा साक्षरता व संवर्धन अभियानाच्या माध्यमातून पशुपालकांना सकस चारा व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन करण्यात आले. हातेड येथील श्रेणी-१ पशुवैद्यकीय दवाखान्याच्या पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. वैजयंता टेकाडे यांनी निकृष्ट दर्जाच्या कडबा-कुट्टीवर युरिया प्रक्रिया करून तिची पौष्टिकता वाढविण्याबाबत प्रत्यक्ष प्रात्यक्षिक सादर केले. यावेळी युरिया प्रक्रियेची पद्धत आणि पशुखाद्य व्यवस्थापनातील तिचे महत्त्व समजावून सांगण्यात आले.
तसेच अझोला ही पाण्यात वाढणारी पौष्टिक जलवनस्पती पशुखाद्य म्हणून कशी वापरता येते, याची माहिती देण्यात आली. हायड्रोपोनिक्स पद्धतीने चारा उत्पादन करण्याविषयीही पशुपालकांना मार्गदर्शन करण्यात आले. उपलब्ध साधनसामग्रीचा योग्य वापर करून पशुखाद्यावरील खर्च कमी करणे आणि दुग्धव्यवसाय अधिक किफायतशीर बनविणे यावर भर देण्यात आला. या वेळी शेतकऱ्यांकडून चारा बियाण्यांची मागणीही नोंदविण्यात आली.
या शिबिराला काझीपुरा परिसरातील प्रगतिशील शेतकरी, पशुपालक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी पशुसंवर्धन विभाग, जळगावचे जिल्हा उपायुक्त डॉ. प्रदीप झोड यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच राहुल बाविस्कर, मनोज महाजन, प्रवीण साळवे, सागर चौधरी आणि तुषार सोनवणे यांनी विशेष सहकार्य केले.
पशुधनाचे आरोग्य सुधारण्यासोबतच सकस चारा व्यवस्थापनाच्या आधुनिक पद्धतींची माहिती ग्रामीण भागातील पशुपालकांपर्यंत पोहोचविण्यासाठी हे शिबिर उपयुक्त ठरले.










