तीन महिने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनचरित्राचे पठण; सहभागी उपासक आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान
प्रतिनिधी : मोताळा : तालुक्यातील कोथळी येथील धम्मदीप बुद्ध विहारात वर्षावासानिमित्त आयोजित अखंडित ग्रंथ पठणाच्या २७ व्या वर्षाची सांगता अश्विनी पौर्णिमेच्या मंगलमय वातावरणात उत्साहात झाली. आषाढी पौर्णिमेपासून अश्विनी पौर्णिमेपर्यंत सलग तीन महिने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनचरित्राचे पठण करण्यात आले. या उपक्रमातून धम्मसंस्कार, वाचनसंस्कार आणि सामाजिक प्रबोधनाची परंपरा जपण्यात आली.
कार्यक्रमाच्या प्रारंभी दररोज ग्रंथ पठणासाठी उपस्थित राहणारे धम्म उपासक यादव वानखेडे, किसन वाकोळे आणि पदरी सावळे यांच्या हस्ते दीप-धूप प्रज्वलित करून अधिष्ठानाचे पूजन करण्यात आले. त्यानंतर क. टी. सावळे, प्रमोद वानखेडे, संभाजी तायडे, सोपान साबळे आणि युवराज भिडे यांच्यासह धम्मदीप बुद्ध विहार उपासिका संघ, बालसंस्कार केंद्र व डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिका केंद्रातील सदस्यांनी पूजन केले.
त्रिशरण-पंचशील ग्रहण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. युवराज भिडे यांनी ग्रंथ पठण केले, तर सोपान सावळे यांनी वर्षावास आणि अश्विनी पौर्णिमेचे महत्त्व विशद केले.
तीन महिने चाललेल्या ग्रंथ पठण उपक्रमात सहभागी झालेल्या पूनम वानखेडे, अनुष्का सावळे, समीक्षा सावळे, अंकिता सावळे, पूजा सावळे, पवनी भिडे, आराध्या सावळे, महेंद्र धुरंधर, युवराज भिडे आणि सोपान सावळे यांचा सत्कार करण्यात आला.
वर्षावासाचे मानकरी म्हणून मनोहर वानखेडे यांचा सन्मान करण्यात आला. तसेच धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त अन्नदान करणाऱ्या पैलवान ग्रुपचा आणि खीर तयार करण्यासाठी सहकार्य करणारे बुडनभाई व ज्ञानेश्वर भारसाखळे (गोल्डन हॉटेल) यांचाही सत्कार करण्यात आला.
शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचाही या वेळी गौरव करण्यात आला. त्यामध्ये प्रसेंजित गजानन सावळे (बारावी – ७३ टक्के), सम्यक सोपान सावळे (दहावी – ८७.४० टक्के), अंकिता मधुकर सावळे (नर्सिंग) आणि प्रीती कैलास सावळे (नर्सिंग) यांचा समावेश होता.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेंद्र धुरंधर यांनी केले. यावेळी उपस्थितांनी दर रविवारी बुद्ध विहारात येण्याचा संकल्प केला.
धम्मदीप बुद्ध विहार, कोथळी येथे गेल्या २७ वर्षांपासून अखंडितपणे ग्रंथ पठणाची परंपरा सुरू आहे. या उपक्रमातून वाचन, शिक्षण, धम्मसंस्कार आणि सामाजिक प्रबोधनाचा संदेश समाजापर्यंत पोहोचविण्याचे कार्य केले जात आहे. वर्षावासाच्या सांगतेनिमित्त आयोजित या सोहळ्याने या परंपरेला पुन्हा एकदा उजाळा दिला.










