रस्त्याकडेला फळ-भाजी विक्रेत्यांना समज; उद्यापासून अतिक्रमण केल्यास थेट कायदेशीर कारवाईचा इशारा
प्रतिनिधी, सातारा
मोळाचा ओढा ते कोंडवे या मुख्य रस्त्यावर फळ आणि भाजीपाला विक्रेत्यांमुळे होणारी वाहतूक कोंडी तसेच अपघातांचा धोका लक्षात घेऊन सातारा तालुका पोलिसांनी पुन्हा एकदा विशेष मोहीम राबवली आहे. गुरुवारी पोलिसांच्या पथकाने या परिसरात प्रत्यक्ष पाहणी करून रस्त्याकडेला व्यवसाय करणाऱ्या विक्रेत्यांना सूचना दिल्या. तसेच उद्यापासून नियमांचे उल्लंघन करून रस्त्यावर अतिक्रमण करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा सज्जड इशारा दिला आहे.
मोळाचा ओढा ते कोंडवे या मार्गावर सायंकाळच्या वेळी मोठ्या संख्येने फळ आणि भाजीपाला विक्रेते रस्त्यालगतच दुकाने थाटतात. या ठिकाणी खरेदीसाठी येणारे नागरिक आपली वाहने रस्त्यावरच उभी करतात. त्यामुळे या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण होते. परिणामी वाहनचालक आणि प्रवाशांची गैरसोय होत असून अपघात होण्याची शक्यताही वाढत आहे.
या समस्येची दखल घेत सातारा तालुका पोलीस ठाण्याच्या पथकाने गुरुवारी संबंधित परिसरात विशेष मोहीम राबवली. यावेळी पोलिसांनी फळ व भाजीपाला विक्रेत्यांची भेट घेऊन रस्त्यावरील वाहतुकीला अडथळा होणार नाही, अशा सुरक्षित ठिकाणी व्यवसाय करण्याच्या सूचना दिल्या.
पोलिसांनी पहिल्या टप्प्यात दंडात्मक किंवा जप्तीची कारवाई न करता विक्रेत्यांना समज देत योग्य त्या सूचना केल्या आहेत. मात्र, उद्यापासून या सूचनांकडे दुर्लक्ष करून रस्त्यावर अतिक्रमण करणाऱ्यांवर थेट कायदेशीर कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
वाहतूक सुरळीत राहावी आणि नागरिकांची सुरक्षितता अबाधित राहावी, यासाठी विक्रेत्यांनी पोलिसांच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.











