कांदिवली येथे पदाधिकारी सन्मान सोहळा उत्साहात; समाजाच्या समस्या सोडविण्यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला प्राधान्य द्यावे – विजय भाई गिरकर
मुंबई
भाजपा उत्तर मुंबई जिल्हा भटक्या-विमुक्त मोर्चाच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा निवडपत्र वितरण व सन्मान सोहळा गुरुवार, दि. २९ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता कांदिवली पश्चिम येथील जिल्हा कार्यालयात उत्साहात पार पडला. यावेळी विविध पदांवर निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांना मान्यवरांच्या हस्ते निवडपत्रे देऊन पुष्पगुच्छ प्रदान करत सन्मानित करण्यात आले.
हा कार्यक्रम लोक कल्याण कार्यालय, ५६ वालसिनोर सोसायटी, अग्निशमन केंद्रासमोर, एस. व्ही. रोड, कांदिवली पश्चिम येथील भाजपा उत्तर मुंबई जिल्हा कार्यालयात आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रमात मार्गदर्शन करताना विजय भाई गिरकर यांनी समाजाच्या समस्या सोडविण्यासाठी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सातत्याने प्रयत्नशील राहावे, असे आवाहन केले. ते म्हणाले, “कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी कष्ट करण्याची तयारी ठेवली पाहिजे. आपल्या समाजातील अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. भाषणापेक्षा कामाला अधिक महत्त्व द्यावे. मला काय मिळाले, यापेक्षा माझ्या समाजाला काय मिळेल, याकडे लक्ष द्यावे. समाजातील ४० जातींना योग्य प्रतिनिधित्व मिळाले पाहिजे.”
यावेळी बाळा तावडे, चंद्रकांत शिंदे, अप्पा बेलवणकर, संदेश कोलापटे, गिरीधर साळुंखे, आमदार योगेश सागर आणि विजय भाई गिरकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना निवडपत्रांचे वितरण करून त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.
यावेळी उत्तर मुंबई जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक बाळा तावडे यांनी पक्षाची संघटनात्मक ताकद वाढविण्यासाठी आणि पक्षविस्तारासाठी सर्व नवनियुक्त पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकजुटीने प्रयत्न करावेत, असे आवाहन केले.
या सोहळ्याला भाजपा उत्तर मुंबई जिल्ह्यातील महिला व पुरुष पदाधिकारी तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. नवनियुक्त पदाधिकाऱ्यांच्या निवडीमुळे संघटनात्मक कामाला अधिक गती मिळेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.











